गडहिंग्लज : येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे, त्यांच्या पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांच्या तिहेरी आत्महत्याप्रकरणी अटकेतील येथील ‘त्या’ माजी नगरसेविकेसह अमरावतीचे सपोनि राहुलकुमार राऊत याच्या घराची पोलिसांनी मंगळवारी झडती घेतली. परंतु, हाती काहीच लागले नाही. अन्य संशयित विशाल बाणेकर व संकेत पाटे (रा. पुणे) हेदेखील अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या तिहेरी आत्महत्येचे गूढ कायम आहे.मंगळवारी दुपारी पोलिसांनी ‘त्या’ नगरसेविकेला येथील तिच्या राहत्या घरी नेले. घरातील तिजोरी व कपाटांची झडती घेतली. सायंकाळी राऊत याला त्याच्या मूळगावी निलजी (ता. गडहिंग्लज) येथील घरी नेले. त्या ठिकाणीही झडती घेतली. परंतु, काहीच मिळाले नाही.
आजी, आत्याला धक्काराऊतच्या घरी त्याच्या वयोवृद्ध आजी तर शेजारी त्याची आत्या राहते. मोठा साहेब असलेल्या राहुलकुमारला पोलिसांनी हातात बेड्या घालून आणल्याचे पाहून त्यांनाही धक्का बसला. परंतु, आपण निर्दोष असल्याचे तो त्यांना कानडीतून सांगत होता.
२५ नग दागिने, रोकड जप्तविजापूर येथील हॉटेलातून ‘त्या’ नगरसेविकेसह सपोनि राऊतला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी तिच्याकडे मिळालेले सोन्या व चांदीचे २५ नग दागिने व रोकड पोलिसांनी जप्त केले आहेत. ते दागिने कुणाचे आहेत ? मृत शिंदेंकडून तिने खंडणी स्वरूपात घेतले आहेत का ? याचा तपास केला जात आहे.
बँकांकडे मागितला तपशीलमृत संतोषकडून तिने पैसे उकळले आहेत का ? याच्या तपासासाठी येथील काही बँकाना लेखी पत्र देऊन तिच्या खात्यावरील व्यवहारांचा तपशील मागितला आहे, असे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी सांगितले.
सासऱ्याच्या तक्रारीची चौकशीपतीच्या निधनानंतर ‘ती’ नगरसेविका घरातील सर्व दाग-दागिन्यांसह सपोनि राऊत याच्याबरोबर पळून गेली. त्यावेळी तिच्या सासऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्या तक्रारीचीही पोलिस चौकशी करीत आहेत.