निंगाप्पा बोकडे
चंदगड:
चंदगड, आजरा तालुक्यासह परिसरातील कर्नाटकातील बेळगाव व खानापूर तालुक्यातील काजू उद्योगाला कमी दर, फसवणूक व शासनाचे उदासीन धोरण यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याची भरपाई म्हणून उद्योजकांचा कल स्थानिक काजूला प्राधान्य न देता विदेशी काजू खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे याचा फटका तालुक्यातील काजू उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.
चंदगड व आजरा तालुक्याची भौगोलिक रचना पाहता काजू उत्पादनास येथील वातावरण पोषक आहे. त्यामुळे चंदगड, आजरा तालुक्यासह लगतच्या बेळगाव व खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू बागायतदार आहेत. मोठ्या प्रमाणात कच्चा माल, मुबलक व स्वस्त मनुष्यबळ यामुळे काजू उद्योग मोठ्या प्रमाणात स्थिरावला आहे; पण गेल्या काही वर्षांपासून बेनीन, इंडोनिशिया, टाझांनिया, बोके, कोनक्री, केनिया व अफ्रिकन देश येथील स्वस्त परदेशी काजूची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि काजू उद्योजकांची स्थानिक काजूवरची मायाच कमी झालेली पहावयास मिळत आहे.
चंदगड तालुक्यात काजू प्रक्रिया करणारे २०० हून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. त्यांना वर्षाकाठी जवळजवळ १ लाख टन कच्च्या काजूची गरज आहे. त्यातच तालुक्यात दरवर्षी सरासरी ३० हजार टन काजू उत्पादन होते. त्यामुळे उद्योगाला ज्यादा लागणारी काजू आयातच करावी लागते. यंदाही १५ हजार टनापेक्षा जास्त परदेशी काजू आयात करण्यात आली आहेत. १० हजार टन स्थानिक काजू मात्र अद्याप तशीच काजू उत्पादकांकडे पडून आहे. काजूला हमीभाव नसल्यामुळे बाजारपेठेत होणारा दर अंतिम समजला जातो. देशातील महत्त्वाची मेंगलोर बाजारपेठेत विशेषत: हे दर निश्चित होत असतात. त्या बाजारपेठेत येणारा तयार काजूमाल हा जास्त करून परदेशी असतो. सध्या परदेशी काजूचे दर ९२ ते ९५ रुपये किलो आहे आणि स्थानिक काजू उत्पादकांची किलोला १६० रुपयांची मागणी आहे. त्यामुळे परदेशी व स्थानिक काजूच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याने काजू उत्पादकांनी परदेशी काजूला पसंती दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज
आमदार राजेश पाटील यांनी या काजू उद्योगाला स्थैर्य मिळावे, यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालविले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यात स्थानिक पातळीवर काजू उत्पादक व उद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज असून, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-----------------------
प्रतिक्रिया
२०१८ मध्ये काजू व्यापाऱ्यांमधील चढाओढ व अज्ञान यामुळे कच्चा काजू १६० रुपयाने खरेदी करण्यात आला; पण त्याचा उतारा, मिळालेला दर यामुळे बराच तयार माल कारखान्यात पडून राहिला. याचा फायदा तथाकथित व्यापाऱ्यांनी घेतला. चढ्या दराने तयार काजू खरेदी केला; पण त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे ज्या अनेक तरुणांनी बँकांकडून कर्ज उचलेली होती, ते अडचणीत आले असून, त्यांना सावरण्याची गरज आहे.
- प्रा. दीपक पाटील, काजू उद्योजक.
-------------------------
काजू उत्पादक शेतकरी संयमी आणि अभ्यासपूर्ण भूमिकेत
परदेशी काजूच्या तुलनेत चंदगड तालुक्यातील काजू दर्जेदार आणि रुचकर आहे. आकाराने जरी लहान असली तरी तिला उताराही तितकाच आहे. चवीमुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यावर्षी उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. शिवाय उपादन खर्च पाहता किलोला १६० रुपये दर मिळावा, अशी आपली मागणी आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात उद्योग अडचणीत आहेत, असे कारण पुढे करून सरकारकडून उद्योजकांनी जीएसटी कर परतावा घेतला. त्यावेळी त्यांनी काजूला ज्यादा दर देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळावे.
- एम. के. पाटील, काजू उत्पादक शेतकरी, तुर्केवाडी.