कोल्हापूर : उद्योजकीय व्यासपीठ म्हणून २९ वर्षे कार्यरत असलेल्या, छोटे-मोठे असे सुमारे ४५० उद्योजक आणि साधारणत: १८ हजार कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा)च्या सन २०१५-१६ वर्षाच्या अध्यक्षपदी देवेंद्र दिवाण यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोशिमा’ची भविष्यातील वाटचालीच्या योजना, उद्योगांचा कर्नाटकात स्थलांतरणाचा मुद्दा, आदींबाबत अध्यक्ष दिवाण यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : ‘गोशिमा’च्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत काय सांगाल?उत्तर : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ही अधिकतर ‘लघु-मध्यम उद्योजकांची वसाहत’ म्हणून ओळखली जाते. या उद्योजकांना त्यांच्या विविध समस्या, अडचणी मांडण्यासह काही मुद्द्यांवर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशातून १९८६ मध्ये ‘गोशिमा’ची स्थापना झाली. या औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीतील असल्याने आपला व्यवसाय, उद्योग सांभाळत त्यांनी ‘गोशिमा’ वाढविली आहे. खडतर स्थितीतून वाटचाल करून ‘गोशिमा’ने मूलभूत गरजांची पूर्तता केली आहे. ही असोसिएशन आता एका स्थिर टप्प्यावर आली आहे. ज्येष्ठ उद्योजकांनी ‘गोशिमा’च्या लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून उद्योजक, कामगार अशा प्रत्येक घटकाच्या दृष्टीने तो फलदायी वृक्ष बनविण्याच्या दृष्टीने सभासद व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहणार आहे.प्रश्न : असोसिएशनच्या विकासाचे नियोजन काय केले आहे?उत्तर : असोसिएशनचे सध्या ३८२ सभासद आहेत. नव्याने उद्योग-व्यवसाय सुरू केलेल्या काही उद्योजकांना सभासदत्व दिले जाईल. सध्या सर्वच क्षेत्रांत ई-प्रणालीचा वापर वाढला आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही उद्योजकाला अथवा ‘गोशिमा’ सदस्य, कोल्हापुरातील उद्योजक देश-परदेशांत कुठेही असताना त्यांना ‘गोशिमा’ आणि कोल्हापुरातील घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी असोसिएशनची अद्ययावत ई-प्रणाली कार्यान्वित करणार आहे. यात ‘गोशिमा’ची अद्ययावत वेबसाईट, वेबपोर्टल, ट्विटर अकौंट, ब्लॉग आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, अँड्रॉईड व अॅपल मॅग्वन टॉशवर चालणारी प्रणाली कार्यान्वित केली जाईल. आॅनलाईन कार्यप्रणाली राबविण्यासह कोल्हापूरशी निगडित असलेल्या रंकाळा स्वच्छता, पंचगंगा प्रदूषणमुक्ती अशा सामाजिक उपक्रमांतील असोसिएशनचा सहभाग वाढविणार आहे.प्रश्न : उद्योजक, कामगारांच्या दृष्टीने काय केले जाणार आहे?उत्तर : उद्योजक, कामगारांच्या विविध स्वरूपांतील छोट्या-मोठ्या अडचणी असतात. त्या जाणून घेण्यासह सोडविण्यासाठी यापूर्वीच्या अध्यक्षांनी सुरू केलेली ‘ब्लॉकवाईज’ मीटिंग सुरू ठेवली जाईल. त्यापुढील एक पाऊल म्हणून ‘गोशिमा’च्या कार्यालयात दर शुक्रवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत मी उपलब्ध असणार आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणत: १८ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यांना बससेवेतील नियमितता तसेच अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याचे प्रयत्न करणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत रक्तदान शिबिर, धान्यवाटप असे उपक्रम राबविणार आहे. ‘गोशिमा’ला उद्योजक-कामगार यांच्या समन्वयाचे केंद्र म्हणून विकसित करावयाचे आहे. उद्योगरथ सक्षमपणे चालण्यासाठी या दोन घटकांत समन्वय महत्त्वाचा असून, तो अधिक चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करण्याचा माझा प्रयत्न राहील.प्रश्न : कर्नाटकमध्ये स्थलांतरणाबाबत भूमिका काय राहणार?उत्तर : स्वकर्तृत्ववावर उद्योग वाढविणाऱ्या पहिल्या पिढीतील महाराष्ट्रातील उद्योजकांना राज्य सरकारकडून वीज, पाणी आणि जमीन या पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत दुर्लक्ष होऊ लागले. गेल्या चार वर्षांत याचे प्रमाण वाढले. त्यामुळे नाइलाजास्तव कोल्हापूरसह राज्यातील उद्योजकांना कर्नाटकात स्थलांतरणाचा विचार करावा लागला. कर्नाटकमधील स्थलांतरणाऐवजी त्याला मी ‘विस्तारीकरण’ असे म्हणेन. कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील उद्योजकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. कर्नाटकामधील स्थलांतरणाला नाही, तर विस्तारीकरणाला बळ देण्याची माझी भूमिका राहील.प्रश्न : औद्योगिक वसाहतीबाबत नवीन काय केले जाणार आहे?उत्तर : मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रबरोबरच मेक इन कोल्हापूर संकल्पनेद्वारे उद्योजकांच्या प्रगतीला हातभार लावणारे प्रकल्प, उपक्रम ‘गोशिमा’च्या माध्यमातून राबविण्यात येईल. कुशल मनुष्यबळाच्या विकासासाठी असोसिएशनचे ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित आहे. त्याला सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर म्हणून विकसित केले जाईल. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत बहुतांश फौंड्री शॉप आहेत. यातील सॅँडमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सॅँड रिक्लमेशन प्लँटचे काम सुरू आहे. त्याला गती देऊन ते मार्च २०१६ अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्लँटमुळे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी होण्यास हातभार लागणार आहे. उद्योजकांना त्यांचे उत्पादन व अन्य काही बाबींची तपासणी करता यावी यासाठी टेस्टिंग सेंटर आणि उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, अद्ययावत कन्व्हेन्शिअल सेंटर असे नवे प्रकल्प ‘गोशिमा’द्वारे राबविण्याचा विचार आहे.- संतोष मिठारी
उद्योजक-कामगार समन्वयाचे केंद्र साकारणार
By admin | Published: December 17, 2015 12:24 AM