कोल्हापूर : शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील प्रवेश ही केवळ औपचारिकता राहिल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. उद्या याबाबत दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे.मंडलिक यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा झाला आणि त्यामध्ये मंडलिक यांनी शिंदेसोबत जावे असा निर्णय घेण्यात आला. खासदार माने यांनी असा कोणताही जाहीर मेळावा घेतला नाही परंतु प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संपर्क साधला असून यातील त्यांचे काही ऑडिओ कॉलही व्हायरल केले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभरात दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या. ज्या १२ खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये कोल्हापूरचे मंडलिक आणि माने हे सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंडलिक आणि माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा हात धरल्याचे स्पष्ट झाले.
त्यांनी विनंती केली, जरूर विचार करूशिंदे गटाने मी त्यांच्यासोबत जावे म्हणून विनंती केली आहे. त्याचा जरूर विचार करू, अशी प्रतिक्रिया मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सालस, सुसंस्कृत आणि कुटंबप्रमुख म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहतो. मुख्यमंत्रिपदासाठी काही गोष्टी झाल्या; परंतु ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, मतदारसंघात आम्ही फार काम करू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचा विचार करूनच पुढचा विचार करणार आहे.
परिस्थिती हाताबाहेर गेलीशिवसेनेत फूट पडू नये यासाठी आम्ही गेले महिनाभर प्रयत्न केले परंतु अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, अशी भूमिका मांडणारा खासदार माने यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात, आम्ही शिवसेना सोडली असे म्हणता येणार नाही. कोरोनामुळे निधी मिळाला नाही. मतदारसंघात कामे झाली नाहीत. शेवटी मतदारांना तुम्ही कामच दाखवायला पाहिजे ना. मतदारसंघाच्या फायद्यासाठी प्रवाहाबरोबर जाण्याचे फायदे लक्षात घ्यायला पाहिजेत.
गुवाहाटीतून सही
इचलकरंजी महापालिकेचा मुद्दा कोणाच्या डोक्यातही नव्हता परंतु आपण तो प्रस्ताव तयार करून पाठवला आणि एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून त्याला सही करून मंजुरी दिली लगेच मोठं काम झालं. शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत निवेदन दिल्यानंतर तातडीने निर्णय घेतला. हा त्यांच्याकडूनचा प्रतिसाद असल्याचेही माने यांनी म्हटले आहे.उद्याच होणार चित्र स्पष्ट..शिवसेनेचा कोणता गट अधिकृत यासंबंधीची एकत्रित सुनावणी बुधवारी (दि.२०) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो याची शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस मुख्यत: खासदारांची उघड भूमिका घ्यायची तयारी नाही. न्यायालयात काही उलटसुलट घडले तर सगळेच मुसळ केरात जाईल, अशी भीतीही त्यांना वाटत आहे. त्यामुळे तिथे एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर खासदार उघडपणे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.