कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळील पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड प्रकरण महानगरपालिका पर्यावरण अभियंता तथा प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे व प्रभारी मुकादम अमृत गजानन शिंदे यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी उशिरा या दोघांनाही वृक्षतोड प्रकरणी निलंबित केले.रंकाळा तलावाला लागून असलेल्या पद्माराजे उद्यान परिसरातील नागरिक तसेच संघटनांनी उद्यानातील दोन रबर जातीचे वृक्ष तसेच इतर वृक्षांच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी दि. २४ जानेवारी रोजी एका अर्जाद्वारे केली होती. कोणी मागणी केली म्हणून वृक्ष तोडता येत नाहीत, म्हणून पर्यावरण अभियंता तथा प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे यांनी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण समिती समोर हा अर्ज प्रस्तावाच्या माध्यमातून मंजूरी करिता ठेवला होता. वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक दि. २६ फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीत फाद्या तोडण्यास मान्यता देण्यात आली, परंतु वृक्ष तोडीची मागणी अमान्य करण्यात आली होती.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही न ठेवता समीर व्याघ्रांबरे व प्रभारी मुकादम अमृत शिंदे यांनी बुम, कटरच्या सहाय्याने दोन रबर जातीचे वृक्ष तसेच अन्य काही वृक्ष बुडक्यासह तोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत वृत्तपत्रातून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.
वृत्तपत्रातून जेंव्हा वृक्षतोडीची चर्चा झाली तेंव्हा व्याघ्रांबरे यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या मान्यतेनेच ही वृक्षतोड झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे समितीवरील अशासकीय सदस्य दुखावले होते. आम्ही वृक्ष तोडण्यास मान्यता दिली नाही, केवळ फांद्या तोडण्यास मान्यता दिल्याचा खुलासाही अशासकीय सदस्यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणाला व्याघ्रांबरे आणि समिती सदस्यामधील वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
वृक्षतोडीची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर प्रशासक मंजूरलक्ष्मी यांनी सोमवारी सायंकाळी उशीरा ही निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. निलंबित कालावधीत दोघांनी मुख्य कार्यालयात रोज उपायुक्त कार्यालयात हजेरी देण्याची आहे.