कोल्हापूर : शाळेचा पहिला दिवस... थोडी उत्सुकता, थोडी भीती, नवी स्कूल बॅग, नवी पुस्तकं, नवा युनिफॉर्म यांमुळे उत्साहात आणखी भर... त्यातच पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आई-बाबाही बरोबर. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस हा तसा खास दिवस. या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’तर्फे शहरातील व ग्रामीण भागांतील शाळांमध्ये पर्यावरण संदेश देऊन शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले. शहरातील विविध शाळांमध्ये बुधवारी सकाळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत, वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले. ‘लोकमत’च्या शाळेतील पहिल्या दिवसाचे अनोख्या पद्धतीने स्वागत उपक्रमांचे अनेक शाळांमधून मोठे कौतुक करण्यात आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात ‘लोकमत’तर्फे लावण्यात आलेल्या रोपट्याला वाढविण्याचा निर्धारही यावेळी केला. कसबा बावडा येथील जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयात बुधवारी ‘लोकमत’तर्फे वृक्षारोपण करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा संदेश देत शाळाप्रवेश साजरा केला. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी या विद्यार्थ्यांचे औक्षण करून साखर-पेढे वाटले. यावेळी शाळेच्या आवारात ‘लोकमत’तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जीवन कल्याण एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश देशपांडे, सहसचिव विजय घोरपडे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील, सहायक व्यवस्थापक (वितरण) भारत माने, प्राथमिकचे मुख्याध्यापक मोहन आवळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. जरगनगर येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग या शाळेत ‘लोकमत’चे सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा व काळजी घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. तत्पूर्वी शाळेतर्फे नवागतांचे स्वागत औक्षण व साखर-पेढे वाटून करण्यात आले. तसेच पहिल्या आलेल्या काही मुलांना मास्क वाटण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उत्तम गुरव, संजय पाटील, के. बी. पाटील, कुलदीप जठार, अर्चना पाटील, नामदेव उंडे, रूपेश नाडेकर, बी. आर. कांबळे, सहायक व्यवस्थापक (वितरण) भारत माने, उपस्थित होते.याशिवाय उषाराजे हायस्कूल, चाटे इंग्लिश स्कूल, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, साई इंग्लिश मीडियम स्कूल, अॅड. पी. आर. मुंडरगी हायस्कूल, नूतन मराठी हायस्कूल, नूतन मराठी विद्यालय ब्रॅँच नं. १, इंदुमती जाधव विद्यामंदिर, संकल्प माध्यमिक हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, चेतना विकास या ठिकाणी हा उपक्रम राबविला. या उपक्रमात ‘लोकमत’ कोल्हापूरचे सहायक वितरण व्यवस्थापक भारत माने, वितरण अधिकारी विश्वजित पाटील, राहुल व्हटकर, सोमनाथ बोडके, अवधूत पोळ, धनाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पर्यावरण जागृती : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृतीचे संदेश देऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत, पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच प्रत्येक शाळेच्या प्रांगणात झाडे लावून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
वृक्षारोपणाद्वारे दिला ‘लोकमत’ने पर्यावरण संदेश
By admin | Published: June 16, 2016 12:37 AM