पोपट पवारकोल्हापूर : घोड्यावर बसलेल्या युगपुरुषाने घोड्याचा लगाम ओढावा अन् त्याक्षणी घोडा थांबावा इतका तो देखणा पुतळा..हा रुबाबदार पुतळा पाहून गेल्या ५० वर्षांत रस्त्यावरून जाणाऱ्यांचे हात क्षणात जोडले नाहीत अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळ..ऊन, वारा अन् पावसातही तो पुतळा पहाडासारखा उभा आहे, जणू सह्याद्रीच्या रक्षणासाठी या युगपुरुषाने घोड्याला टाप दिल्याचा भास व्हावा. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीला येत्या १ डिसेंबरला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील शिल्पकार बी.आर. खेडकर यांनी उभारलेल्या या पुतळ्याने विद्यापीठासह कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात अन् अस्मितेतही मोलाची भर घातली आहे.
शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ज्यांच्या नावे हे विद्यापीठ सुरू आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विद्यापीठात असावा अशी भावना पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांची झाली. त्यातून त्यांनी १९७० मध्ये जाहिरात देऊन पुतळ्याचे मॉडेल्स मागविले. यात बी.आर. खेडकर यांचे मॉडेल्स त्यांना आवडले. त्यानुसार ते काम त्यांना देऊन पुतळा तयार करण्यास सुरुवात झाली. शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी खेडकर यांनी अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी काही पुतळे व घोड्यांचेही निरीक्षण केले. शिवरायांचा चेहरा, पोशाख, आभूषणे, लगाम खेचून उभा राहिलेला घोडा याचा अभ्यास करत खेडकर यांनी १९७१ मध्ये पुतळा तयार करण्यास सुरुवात केली. १८ फूट ६ इंच उंची व ८ टन वजनाचा हा पुतळा त्यांनी तीन-साडेतीन वर्षांत तयार केला. देशाचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १ डिसेंबर १९७४ ला या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.काटेकोरपणे देखभालया पुतळ्याची देखभाल विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाकडून केली जाते. शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी पुतळा उभारल्यानंतर देखभालीसाठी काही सूचना केल्या होत्या. याची झीज होऊ नये यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनांचे अभियांत्रिकी विभागाकडून काटेकोरपणे पालन केले जाते. प्रत्येक महिन्याला पुतळ्याची स्वच्छता केली जाते.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हे सगळ्यांचे ऊर्जास्थान आहे. शिल्पकार बी.आर. खेडकर यांनी तत्कालीन कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली एका अप्रतिम पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा म्हणजे लाखो विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. या पुतळ्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. -डॉ.डी.टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
दृष्टिक्षेपात पुतळा
- उंची १८ फूट ६ इंच
- वजन : ८ टन
- जमिनीपासून चबुतऱ्यापर्यंतची उंची : ३६ फूट ६ इंच
- घोड्याची लांबी-२० फूट