कोल्हापूर : पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व स्मारक उभा करणार असल्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शासनाच्या धोरणानुसार पुतळ्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे पुतळ्याच्या उभारणीसाठी २५ लाख रुपयांचा निधी हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून शिल्पकार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने पन्हाळगड पावन झालेला आहे. या किल्ल्याला सिद्धी जोहरने साधारणत: चार महिने वेढा दिला होता. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज सहीसलामत सुटून विशाळगडाकडे रवाना झाले. परंतु याच किल्ले पन्हाळगडावर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नाही, याची मनाला खंत होती. वर्षभरापूर्वी पंचायत समितीच्या बाजूलाच असलेल्या शिवतीर्थ उद्यानातील अर्धपुतळ्याला अभिवादन केले आणि त्याचवेळी पन्हाळगडावर अश्वारुढ पुतळा उभा करण्याचा निर्धार केला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, नितीन दिंडे, प्रा. मधुकर पाटील उपस्थित होते.
Kolhapur: पन्हाळगडावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:02 PM