लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी राज्य शासनाने १४ कोटी ९८ लाख ८२ हजार ४८६ रुपये निधीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली. त्याचबराेबर करवीर पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठीही ७३ लाख २३ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून दोन्ही कार्यालयांसाठी निधी मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून करवीर तहसील कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवर एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयासदेखील खुरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारतीमध्ये नवीन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी सहकार्य केले.