सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असलीतरी प्रमुख धरणांतून अजूनही विसर्ग सुरूच आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयनेत १००.६० टीएमसी साठा होता. तर धरणाचे दरवाजे चार फुटाने उचलून त्यातून ३२ हजार ५५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत १५ दिवस धुवाँधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वच प्रमुख धरणे भरली आहेत. सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिमेकडे पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी कमी होत चालली आहे. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणात १००.६० टीएमसी इतका साठा असून, दरवाजे चार फुटांनी वर उचलण्यात आलेत. त्यातून ३२ हजार ५५७ व पायथा वीजगृहातून २१०० असा ३४ हजार ६५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धोम धरणात १२.५५ टीएमसी साठा झाला असून, कण्हेरमध्ये ९.३१, बलकवडी ३.७३, उरमोडी ९.५७, तारळी ४.९८, नीरा-देवघर ११.७६, भाटघर २३.६८ आणि वीरमध्ये ९.५६ टीएमसी इतका साठा आहे.
बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ९, धोम ४, बलकवडी १६, नीरा-देवघर ८ आणि भाटघरला ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर धरण परिसरात पावसाची उघडीप होती.धरणातील विसर्ग क्युसेकमध्ये असा...कोयना - ३४६५७, धोम -६२८, कण्हेर - ४००, बलकवडी - ९६२, उरमोडी - ४५०, तारळी - १७२३, भाटघर - २५४० आणि वीर २१५०.