कोल्हापूर : मुंबईहून गावाकडे परत येणा-या भरधाव इर्टिगा कारची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डोजरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २७) सकाळी सहाच्या सुमारास पुणे-बेंगळुरू महामार्गावर घुणकी पुलाजवळ घडला.
या अपघातात राहुल अशोक शिखरे (वय ३०, रा. मिणचे, ता. हातकणंगले) आणि सुयोग दत्तात्रय पवार (वय २८, रा. टोप, ता. हातकणंगले) हे दोघे ठार झाले. वैभव निवास चौगुले (वय २७), सुमित अरुण कुरणे (वय २८), अनिकेत भीमराव जाधव (वय २०, तिघे रा. मिणचे), निखिल आदिनाथ शिखरे (वय २७, रा. टोप) आणि डोजर चालक दादासो विश्वास दबडे (वय ४२, रा. वाठार, ता. हातकणंगले) हे पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिणचे आणि टोप येथील सात जण इर्टिका कारमधून मुंबईहून गावाकडे परत येत होते. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने घुणकी गावाच्या हद्दीतील पुलाजवळ डोजर उभा होता. भरधाव कारने डोजरला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की डोजर उलटला, तर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, राहुल शिखरे आणि सुयोग पोवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.