कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा खुला कैदी लक्ष्मण वसंत धोत्री उर्फ कलगुटकर (वय ३६) याने सोमवारी कारागृहातून पलायन केल्याने कारागृह प्रशासन हदरले आहे. शिक्षेपैकी ११ वर्षांचा कालावधी त्याने शिक्षा भोगली आहे, काहीच कालावधी शिल्लक राहिल्याने त्याच्या वर्तणुकीवरून त्याला खुला कैदी केले होते. कारागृहासमोरील बागकाम करताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा लक्ष्मण धोत्री या कैद्याला गेल्याच वर्षी नाशिक कारागृहातून कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरीत केले होते. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असली तरी त्याचा शिक्षेचा काहीच कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याला शिक्षेच्या शिल्लक कालावधीसाठी खुले कैदी केले होते. तो कारागृहाच्या आवारातच शेती, बागकाम करीत होता.
कारागृहाच्या आवारातच राहात होता. सर्वांशी बोलताना कर्नाटकी भाषेत बोलत होता. सोमवारी दुपारी १२ ते दुपारी २ च्या सुमारास तो अचानक गायब झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. कैद्यांची मोजमाप करताना तो गायब झाल्याची बाब सायंकाळी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने ही बाब जुना राजवाडा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी केली. तो गायब झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा दिली.