संतोष मिठारी ।कोल्हापूर : अकौंट कोडच्या (लेखा क्रमांक) उपलब्धतेची अडचण दूर होताच, आता औषधांअभावी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (ईएसआयसी) कोल्हापुरातील विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग (स्पेशालिस्ट ओपीडी) सुरू झालेला नाही. आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची या विभागाला प्रतीक्षा आहे. या विभागाची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी कामगारांतून होत आहे.
येथील ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहामागील परिसरात विशेषज्ञ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय गेल्या आठ महिन्यांपूर्वी राज्य कर्मचारी बिमा निगमने घेतला. त्यानंतर कामगार दिनी या बाह्यरुग्ण विभागाचा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने ईएसआयसीकडून तयारी सुरू झाली; पण या विभागाचे फर्निचर आणि औषधांच्या उपलब्धतेकरिता आवश्यक असणाऱ्या अकौंट कोड उपलब्धतेअभावी अडचण निर्माण झाली; त्यामुळे हा मुहूर्त लांबणीवर पडला. कोल्हापुरातील कार्यालयाने नवी दिल्लीतील ईएसआयसी कार्पोरेशनकडून हा अकौंट कोड मिळविला. त्यानंतर कोल्हापुरातील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यासाठी बँक, शासकीय कार्यालये, आदी पातळीवरील कार्यवाहीला वेग आला. त्यानंतर हा विभाग सुरू करण्यासाठी आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापर्यंतची डेडलाईन निश्चित करण्यात आली. त्यादृष्टीने पुन्हा गतीने काम सुरू झाले. त्यातून या विभागाच्या इमारतीची रंगरंगोटी, डागडुजी, विद्युत वाहिनी, औषधे ठेवण्याचे रॅक, आदी फर्निचरची उपलब्धता, औषधे आणि सर्जिकल्स् (वैद्यकीय उपकरणे) मागणी, कार्यालयीन कर्मचाºयांची नियुक्ती, डॉक्टरांच्या नेमणुकीसाठीची मुलाखत प्रक्रिया पार पडली.
ईएसआयसीच्या अंधेरीतील कार्यालयाकडून रविवारी (दि. १९) औषधांचा एक ट्रक कोल्हापूरमध्ये आला आहे; मात्र आणखी काही आवश्यक औषधे, सर्जिकल्सची (वैद्यकीय उपकरणे) गरज आहे. ती उपलब्ध झाल्याशिवाय या विभागाचा प्रारंभ होणार नसल्याचे वास्तव आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून हा बाह्यरुग्ण विभाग सुरू होण्याबाबतची कामगारांना प्रतीक्षा लागली आहे. या विभागाची सेवा लवकर सुरू करण्याची त्यांच्याकडून मागणी होत आहे.महानगरपालिकेच्या मदतीची गरज‘ईएसआयसी’चा बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर येथे जैविक कचरा होणार आहे. या कचºयाच्या व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेच्या मदतीची गरज आहे.त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईएसआयसी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. औषधांची उपलब्धता आणि जैविक कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकर मार्गी लागल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाह्यरुग्ण विभाग सुरू होण्याची शक्यता आहे.इमारतीची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छताया ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर ती कुलूपबंद राहिली. या इमारतीच्या परिसराला झाडाझुडपांनी वेढले होते; मात्र गेल्या चार महिन्यांंपासून येथे ओपीडी कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाल्याने इमारतीची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. अंतर्गत नवे रस्ते केले आहेत. या इमारतीच्या परिसरात यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
या ओपीडीसाठी लागणारी काही औषधे आणि वैद्यकीय उपकरणे अंधेरीतील कार्यालयाकडून आली आहेत. काही औषधे येत आहेत. फर्निचरची उपलब्धता झाली आहे. लवकरात लवकर ओपीडी सुरू केली जाईल. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.-डॉ. नीलेश बोंबडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,ईएसआयसी, कोल्हापूर.