कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीची सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. ज्या प्रकारे निवडून येण्याच्या दृष्टीने उमेदवार मोर्चेबांधणी करू लागले आहेत, त्याच पद्धतीने राजकीय पक्षाचे नेतेही व्यूहरचना आखत आहेत. या सगळ्या घडामोडींत निवडणुकीत हमखास निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांना मोठा भाव आला आहे. अशा उमेदवारांना नेतेमंडळी कारभाऱ्यांमार्फत संपर्क साधून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागली आहेत.
निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले तशा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्यांना निवडणुकीसाठी उभे राहण्याची संधी आहे, त्यांनी जोरात तयारी सुरू केली आहे. बहुतेक सर्वच प्रभागांत उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोण कोण उभे राहणार हे स्पष्ट झाले आहे. एकेका प्रभागात एकेका राजकीय पक्षाचे दोन-दोन उमेदवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी मिळाल्यावर दुसरा काय करणार, याकडे प्रतिस्पर्धी पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडशूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून प्रभागात गाठीभेटी, बैठका, तडजोडी, चर्चा यांना जोर आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत मतदारांच्या गाठीभेटींचा कार्यक्रमही सुरू झाला आहे. कोणत्या राजकीय पक्षाकडून उभे राहायचे याचा निर्णय अद्याप काहींनी घेतलेला नाही. आपला प्रभाग, प्रभागातील मतदारांचा प्रवर्ग, कोणाचे वर्चस्व आहे, कोणत्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कल काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जात आहे.
दोन-दोन पक्षांकडून चर्चेचे आमंत्रण
ज्या पद्धतीने उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवर तयारी चालविली आहे, त्याच पद्धतीने राजकीय पक्षाचे नेतेही लक्ष ठेवून आहेत. या प्रक्रियेत मात्र हमखास निवडून येऊ शकतील, अशा उमेदवारांवर नेतेमंडळी लक्ष ठेवून आहेत. आपल्या गटाचा नाही; परंतु नाव चर्चेत आहे, पाठिंबा दिसून येतो अशा उमेदवारांशी कारभाऱ्यांमार्फत नेतेमंडळीतर्फे संपर्क साधून भेटायला येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. एकेका उमेदवारास दोन-तीन राजकीय पक्षांकडून भेटीला येण्याचे आमंत्रण मिळत असल्याने नेमके कोणाकडे जायचे, असा काहींना प्रश्न पडला आहे.
उमेदवारांना वाढता भाव... नेत्यांचे आश्वासने
काही भागांत आपल्याकडे सक्षम उमेदवार नाहीत तेथे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवांशी चर्चा करून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे. ‘तुम्ही आमच्या पक्षाकडून उभे रहा, बाकीचे आम्ही बघतो,’ अशी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे गत निवडणुकीत अमुक एका पक्षाच्या विरोधात निवडून आलेला उमेदवार आता त्याच पक्षाची उमेदवारी घेण्याचीही शक्यता आहे. कॉग्रेसमधील उमेदवार ताराराणी आघाडीकडे, तर ताराराणी आघाडीकडील उमेदवार कॉग्रेसकडे गेल्याचेही पाहायला मिळेल.
निवडणूक सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची
पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांना मागच्या विधानपरिषद निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या आघाडीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. आता आवाडे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जर ते तिकडे गेलेच तर येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवेळी सतेज पाटील यांना बरेच प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच महापालिका निवडणुकीत त्यांना कॉग्रेसचे जास्तीत जास्त तसेच महाआघाडीचे ५५ ते ६० उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत.