कोल्हापूर : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने स्तर ४ मधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार उद्या, सोमवारपासून कोल्हापूरमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र रोज सायंकाळी पाच वाजल्यापासून तसेच शनिवार व रविवारी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी रात्री जाहीर केले.
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे सरसकट राज्याला एकाच प्रकारचे नियम लागू करण्याऐवजी राज्य शासनाने कोरोना पॉझिटिव्ह रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची पाच स्तरांवर विभागणी केली आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश स्तर ४ मध्ये होतो. या विभागासाठीच्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांना चार वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्वी ही वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत होती. रोज सायंकाळी पाचनंतर तसेच शनिवारी व रविवारी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही. ही नियमावली उद्या, सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.
--
व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर ५० टक्के क्षमतेसह
व्यायामशाळा, केश कर्तनालये, ब्यूटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. येथे फक्त लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच सेवा दिली जाईल. शनिवार, रविवारी दुकाने बंद राहतील.
--
मॉर्निंग वॉक, खेळ, चित्रीकरण
नागरिकांना माॅर्निंग वॉक, विविध खेळ, सायकलिंगसाठी सोमवार ते शुक्रवार पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत सार्वजनिक ठिकाणे, उद्याने व मैदानांवर जाता येईल. अलगीकरणाची व्यवस्था असलेल्या व गर्दी होणार नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करता येईल.
---
हे सुरू राहील.
- अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने चार वाजेपर्यंत
- हॉटेलमधील पार्सल सेवा व घरपोच सेवा
- अत्यावश्यक सेवेतील खासगी तसेच शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेसह
- बसेस ५० टक्के क्षमतेसह
- कामगारांच्या राहण्याची सोय असलेले व निर्यातीचे उद्योग व बांधकाम
- बैठका, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या सभा ५० टक्के क्षमतेसह
- लग्नसमारंभ २५ जणांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत.
- कृषी व पूरक सेवा ४ वाजेपर्यंत.
--
हे बंद राहील
- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने
- चित्रपटगृहे, मॉल
- धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व करमणुकीचे कार्यक्रम.
--