कोल्हापूर : शहरातील भाजी मंडईसह सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकानेही आता आज, बुधवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहतील, त्यानंतर दिवसभर बंद राहतील, अशी माहिती महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितली. नागरिकांनीही दुकाने सकाळच्या वेळेत रोज सुरू राहणार असल्याने खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडीसह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तिक व संघटनात्मक) सकाळी सातपासून अकरा वाजेपर्यंतच उघडी राहतील. त्यानंतर ती बंद होतील.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंगळवारी रात्री आठ ते दि. १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सातपासून संध्याकाळी आठपर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळामध्ये फेरबदल करू शकणार आहे.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोनअंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी अध्यादेश जारी केला.