गांधीनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढती संख्या पाहता ठिकठिकाणी कोविड सेंटर उभी करा, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. देशासह संपूर्ण राज्यात कोरोना महामारी वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हजाराच्या टप्प्यात रुग्ण झाले आहेत. काहींना त्यात प्राण गमवावा लागला आहे. रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रत्येक परिसरात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभी करण्यात यावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महासैनिक दरबार हॉलमध्ये कोविड सेंटर उभारले होते. त्याच धर्तीवर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणाला बेड मिळाला नाही, रुग्णालय मिळाले नाही, अशी परिस्थिती कोविड सेंटर उभारल्यास येणार नाही. रुग्णालय शोधण्यासाठी नातेवाइकांची पळापळ व दमछाक होणार नाही. करवीर पूर्व भागात मार्केट यार्ड परिसरातील मंगल कार्यालये ताब्यात घेऊन तिथेही कोविड सेंटर उभारल्यास त्या परिसरातील रुग्णांची सोय होईल. कोरोना दुसऱ्या लाटेचा हाहाकार माजण्यापूर्वीच ही दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, युवा सेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल घोरपडे व शिवानंद स्वामी यांच्या सह्या आहेत.
फोटो : २४ करवीर शिवसेना निवेदन
ओळी: करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारावीत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.