लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आज, मंगळवारपासून नगरपालिका प्रशासकीय ३१ वॉर्ड सम व विषम तारखेला सुरू राहणार आहेत. तसेच सम व विषम तारखेला भागातील यंत्रमाग आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन असेपर्यंत हा नियम लागू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
प्रशासनाने ठरवून दिलेल्या २२ ठिकाणीच आखून दिलेल्या चौकोनात बसून भाजीपाला व फळफळावळ यांची विक्री करता येणार आहे. तसे न आढळल्यास साहित्य जप्त करण्यात येणार आहे. घरपोच भाजीपाला देणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य चौकात डिजिटल फलकावर लॅब टेस्टची यादी व दर याची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शहरात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवारी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. खरेदी व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने अनावश्यक गर्दी होत होती. त्यामुळे या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळात कडक भूमिका घेतली जाणार आहे.
सकाळी सात ते अकरा या वेळेत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार केवळ अत्यावश्यक आस्थापने सुरू राहणार आहेत. या ठिकाणची देखील पाहणी करून कोरोना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. अत्यावश्यक व्यतिरिक्त अन्य आस्थापने सुरू राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात येणार आहे. तसेच विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर ही कारवाई होणार असल्याचेही खरात यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, अप्पर तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते.