प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने यंदापासून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यांची जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच स्थापन झाली असून, नुकतीच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची विभागीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हा व तालुकास्तरांवरील समित्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.राज्यातील २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची ‘विभागीय सनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे.या समितीमध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे अध्यक्ष असून, इतर आठजणांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यात गाळयुक्त शिवार अंतर्गत कामकाजाची माहिती जिल्हास्तरावरील समितीकडून घेणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील समित्या स्थापन झाल्या आहेत. राज्य समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव, तर जिल्हा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी व तालुक्याचे अध्यक्ष हे संबंधित प्रांताधिकारी आहेत. आता विभागीय समिती स्थापन झाली आहे.सध्या या योजनेंतर्गत काम सुरू झाले असून जिल्हास्तरीय समितीकडून तालुकास्तरीय समितीकडून दर आठवड्याला किती गाळ काढला याबाबत आढावा घेतला जात आहे. गाळ साचलेल्या धरणालगत क्षेत्रातील शेतकरी किंवा अशासकीय संस्था हा गाळ स्वखर्चाने काढून न्यायचा असून याबाबत संबंधित तहसीलदार, तलाठी, धरण यंत्रणा उपअभियंता यांना माहिती द्यावयाची आहे. या गाळावर कोणतेही शुल्क सरकारकडून आकारले जात नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व त्यांनी स्वखर्चाने हा गाळ वाहून नेणे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
‘गाळयुक्त शिवार’साठी विभागीय समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 1:01 AM