कोल्हापूर : प्रगतशील शेतकऱ्यांबरोबरच विविध कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील ज्ञानाचे आदानप्रदान होऊन कृषिविस्ताराचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. या उपक्रमात राज्यभरातील ५००९ शेतकऱ्यांची ऑनलाईन साखळी तयार झाली आहे.
कृषिविस्तार कार्यामध्ये शेतकऱ्यांशी नेहमी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शास्त्रज्ञ संवाद साधत असतात; परंतु ज्या शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना जर विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेतले तर कृषिविस्ताराचे कार्य अधिक प्रभावी होऊ शकेल. या उद्देशाने कृषिमंत्री भुसे यांनी रिसोर्स बँकेची संकल्पना मांडली. कृषी विभागानेही ते मनावर घेत राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर व्हाॅटसॲप ग्रुप तयार करून ऑनलाईन पद्धतीने अशा शेतकऱ्यांची साखळीच तयार केली आहे. याच्या माध्यमातून नुसत्या माहितीची देवाणघेवाणच नव्हे तर शेतीमधील नवनवीन प्रयोग व विक्रीची व्यवस्था याबाबतीतही मार्गदर्शन होत आहे.
चौकट ०१
कृषिमंत्री आज संवाद साधणार
रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे आज, सोमवारी संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता कृषी विभागाच्या Agriculture Department, GoM या यूट्यूब चॅनेलवर क्लिक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट ०२
तंत्रज्ञानाची मदत
कृषी विभागातील विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी तसेच विस्तारकार्य प्रभावी करण्यासाठी प्रत्येक कृषी साहाय्यक यांनी त्यांच्या गावातील शेतकऱ्यांचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करून त्यात रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामधून विविध पिकांचे तंत्रज्ञान, वाणांची निवड, खतांची मात्रा, कीडरोग प्रादुर्भाव व नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कृषी विभागाच्या योजना व शेतमालाचे विपणन, इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, अशाच प्रकारचे व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत.