कोल्हापूर : उसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे धोरण लवकरच केंद्र सरकारच्या पातळीवरून जाहीर होणार असल्याची माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याशी झालेल्या चर्चेत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचेही देसाई यांनी सांगितले.अतिरिक्त साखरेमुळे साखर कारखानदारी व शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आगामी हंगामातही उसाचे उत्पादन जास्त असल्याने साखरेचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. साखर उद्योगातील अस्थिरता कायमची संपवायची झाल्यास गरजेपुरती साखर काढून उर्वरित उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करणे हाच उत्तम पर्याय आहे.
ही बाब केंद्र सरकारला पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थ, अन्नमंत्री यांच्या कार्यालयांना भेटी देऊन इथेनॉल निर्मितीबाबत पत्रव्यवहार केला आहे.
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याबरोबर चर्चा झाली. उसासह गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती कशी फायदेशीर आहे, त्याचे महत्त्व पटवून दिले.
त्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या महिला आघाडी राज्याध्यक्षा सुजाता देसाई, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण पोवार आदी उपस्थित होते.