कोल्हापूर : इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, आगामी ऊस गळीत हंगामात खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी. यासह इथेनॉलबाबत जनजागृती होण्यासाठी जूनपासून पश्चिम महाराष्ट्रात मेळावे आयोजित केल्याची माहिती जैवइंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. पेट्रोलपेक्षा सरस असलेल्या व पर्यावरणपुरक इथेनॉल निर्मितीस चालना द्यावी, अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेची आहे. याबाबत गेली दहा - पंधरा वर्षे केंद्राच्या पातळीवर प्रयत्न करीत होतो. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर इथेनॉलचे दर २७ रुपयांवरून ४८.५० रुपयांपर्यंत गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी दिल्लीमध्ये मेळावा घेतला. यावेळी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा झाली. केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती व वापराबाबत सकारात्मक असून, गेल्यावर्षी निर्णय घेणार होतो; पण दुष्काळामुळे घेता आला नाही. यावर्षी इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे मंत्री पासवान यांनी सांगितले. साखर अतिरिक्त झाल्याने निर्यात अनुदान देण्याची वेळ केंद्रावर आली. यापेक्षा गरजेपुरती साखर उत्पादन करून उर्वरित उसापासून इथेनॉल केले, तर साखर उद्योगाबरोबर ऊस उत्पादकाच्या जीवनात निश्चितच स्थैर्य येईल, हे केंद्र सरकारला पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे देसाई म्हणाले. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, आदी सात जिल्ह्णांत १२ ते १३ रिकव्हरीचा जवळपास सात कोटी टन ऊस आहे. पहिल्या टप्यात येथेच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ‘गुरुदत्त’कडे क्षमता! रिलायन्स उद्योग समूह महाराष्ट्रात केवळ इथेनॉल तयार करणारे कारखाने उभे करू शकते; पण त्यांच्याबरोबर इतरांनीही प्रयत्न करावेत, गुरुदत्त शुुगर्सकडे तेवढी क्षमता असून, त्यांच्याकडे आपण प्रस्ताव ठेवल्याचे देसाई यांनी सांगितले.
इथेनॉल जनजागृतीसाठी जूनपासून मेळावे घेणार
By admin | Published: May 15, 2016 12:51 AM