कोल्हापूर : वेतनवाढीच्या मुद्द्यावरून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज एक्सपोर्ट लिमिटेड या सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने टाळेबंदी केली आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांतील बाराशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. शिवाय त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.या कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीचा करार ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपला. यानंतर कामगारांनी नव्या करारात आठ हजार रुपयांची वेतनवाढ मागितली. मात्र, वर्ष संपले तरी याबाबत कंपनीकडून वेतनवाढीची कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीतही करार होईल या अपेक्षेने कामगारांनी आपले काम सुरू ठेवले. यातच १४ जानेवारी २०१६ रोजी कंपनीने टाळेबंदी नोटीस दिली. पण, कामगारांच्या विरोधानंतर व्यवस्थापनाने ती मागे घेतली. यानंतर २ मेपासून अचानकपणे कंपनीच्या युनिट क्रमांक एक आणि दोनमध्ये टाळेबंदी केली. त्यामुळे बाराशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. कंपनीने वेतनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कंपनी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे. दरम्यान, याबाबत वेतनवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन व्यवस्थापनाने कंपनी सुरू करावी. शिवाय बेरोजगार झालेल्या संबंधित कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कामगार उत्कर्ष सभेच्या युरोटेक्स शाखेचे अध्यक्ष सतीश भोसले व सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी आणि सहायक कामगार आयुक्त यांना गेल्या आठवड्यात दिले आहे. नागरिका, इंडोकाउंट इंडस्ट्रीज, रेमंड झंबायटी, सोक्टास जीन्स, मॉन्टी टीशुटिरा यांनी समन्वय, सामंजस्याने वेतनवाढ दिली आहे. त्यानुसार युरोटेक्सच्या व्यवस्थापनाने कार्यवाही करून कंपनी सुरू करावी, अशी कामगारांची मागणी असल्याचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले. निवेदनावर त्यांच्यासह महादेव मानकर, तानाजी चौगले, लहू बरकाळे, संभाजी सुतार, पांडुरंग जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. टाळेबंदीबाबत व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी कंपनीमध्ये दूरध्वनी केला असता, कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे सरव्यवस्थापक पी. डी. चौधरी हे कोल्हापूरच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)वेतनकराराबाबत आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाला २४ नोव्हेंबर २०१४ रोजी एल फॉर्म दिला होता. यानंतर कंपनीची परिस्थिती नाही, असे सांगत वेतनवाढीबाबत व्यवस्थापनाने चालढकल केली. तसेच २ मेपासून अचानक टाळेबंदी केली. त्यामुळे बाराशे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्य सूतगिरण्यांनी केलेली पगारवाढ लक्षात घेऊन कंपनीने आम्हांला वेतनवाढ द्यावी. - सिकंदर नायकवडी, अध्यक्ष, शाहू सूत कापड कामगार संघ.
‘युरोटेक्स’ कंपनीला टाळेबंदीने खळबळ
By admin | Published: May 21, 2016 12:02 AM