कोल्हापूर : शहरात ‘आयआरबी’ने केलेल्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्याचे सोपस्कार राज्य सरकार नियुक्त समितीने आज, गुरुवारी पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार या समितीमधील सदस्यांनी उलट तपासणीचे काम केले. रस्त्यांच्या डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाची कामे चांगली झाली असली, तरी फू टपाथ, ड्रेनेज व गटारींच्या कामांबाबत समितीचे सदस्य नाराज असल्याचे समजते. मात्र, यासंदर्भात समिती सदस्यांनी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या तज्ज्ञांच्या समितीतील राजीव श्रीखंडे व उदय खैराटकर यांनी आज कोल्हापूर शहरास भेट देऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. समितीचे प्रमुख असलेले प्रा. के. व्ही. कृष्णराव हे मात्र आज आले नव्हते. या समिती सदस्यांना रस्ते विकास महामंडळाचे उप अभियंता नरेंद्र भांबुरे व देवेंद्र सरोदे यांनी मदत केली.रस्त्यांच्या मूल्यांकनासंदर्भात समितीने तीन टप्प्यांत पाहणी केली. पहिल्या टप्प्यात टोल विरोधी कृती समिती सदस्य, आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. दुसऱ्या टप्प्यात रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्याकडून झालेल्या कामांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. आणि आज तिसऱ्या टप्प्यांत प्रत्यक्षातील प्रकल्पाचे आराखडे, झालेले सर्व्हेक्षण आणि प्रत्यक्ष झालेले काम याची तुलनात्मक पाहणी करण्यात आली.समितीने शिवाजी विद्यापीठ, कसबा बावडा, रेल्वे उड्डाणपूल, फु लेवाडी, ताराबाईरोड, रंकाळा परिसर, अशा सात रस्त्यांची पाहणी केली. डांबरीकरण, कॉँक्रिटीकरण, रस्त्याकडेला करण्यात आलेली गटारी, फूटपाथ, आदी कामांच्या दर्जाची तपासणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारने आम्हाला झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्याप्रमाणे प्रकल्पाचे आराखडे आणि प्रत्यक्ष झालेले काम याची आज पाहणी झाली. त्यांनी तुलनात्मक आढावा घेतला आहे. मुंबईत गेल्यानंतर प्रत्यक्ष मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होईल. हे काम केव्हा पूर्ण होईल, हे सांगता येणार नाही; पण लवकर अहवाल राज्य सरकारला देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे रस्त्यांची पाहणी केल्यानंतर समितीचे सदस्य श्रीखंडे व खैराटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुल्यांकन समितीने केली पाहणी
By admin | Published: July 24, 2014 11:41 PM