कोल्हापूर : रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवा वर्ग गुंतला होता.मागील वर्षी कोरोनाचा कहर वाढल्यामुळे रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही. त्यामुळे अनेकांनी यंदाची रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा मानस बाळगला होता. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे.तरीसुद्धा बच्चे कंपनीच्या आग्रहाखातर पालक वर्गाने पिचकारी, कोरडे रंग, खाद्य रंग, नैसर्गिक रंग आदीची खरेदी जोरदार केली आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनामुळे साजरी न करता आलेली रंगपंचमी यंदा जोरात करण्याचा पवित्रा बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनीही घेतला आहे. त्यामुळे शहरातील रंगांची दुकाने गुरुवारी दिवसभर गर्दीने ओसांडून वाहत होती. विशेष म्हणजे कोरड्या पिवडी रंगाच्या पोत्यांना अधिक मागणी होती. त्यामुळे शहरातील महानगरपालिका चौक, पापाची तिकटी, शिवाजी चौक, महाद्वार रोड, भवानी मंडप, ताराबाई रोड, पान लाईन, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, आदी ठिकाणी रंग खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बाजारात तरुणाईची गर्दी उसळली होती. दरम्यान गुरुवारी शाळकरी विद्यार्थ्यांनी आज,शुक्रवारी शाळेला गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असल्यामुळे शाळेच्या परिसरात रंगपंचमी साजरी केली.रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारातपाठीवरचा पंप, छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, सिनचॅन, आदी पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात पिचकाऱ्यांची किंमत २० पासून ५०० रुपयांपर्यत होत्या. पॅकिंगप्रमाणे नैसर्गिक, रासायनिक, पर्यावरणपुरक, खाद्य रंगांची विक्री सुरु होती.