पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे उच्च शिक्षणामध्ये मुलींना अधिकतर सेवासुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सरकार सांगत असले तरी मुलींसाठीचे सुरू केलेले अनेक प्रकल्प रेंगाळत असल्याचा अनुभव कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहावरून येत आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे कामाची ही संथगती विद्यार्थिनींच्या गैरसोयीची ठरत आहे.येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींची निवासाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेंडा पार्कात १५० मुलींची क्षमता असणारे वसतिगृह उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी २१.६२ कोटी रुपयांचा निधीही दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम २०२० पासून सुरू आहे. मात्र, या काळात कोरोनाची लाट सुरू असल्याने कामाला ब्रेक द्यावा लागला. पुढे कोरोना संपल्यानंतर हे काम जलद गतीने होणे अपेक्षित होते. मात्र, २०२४ चा मध्य उजाडला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. पाच मजली इमारतीत अजूनही सिव्हिल विभागाची कामे अपूर्ण आहेत. खिडक्यांना तावदाने बसविण्याचे काम सध्या सुरू असून, इमारतीमधील किरकोळ कामांना अजून हातही लागलेला नाही. गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करू, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात असला तरी सद्य:स्थितीतील अपूर्ण कामे व उपलब्ध कामगार पाहता ही डेडलाइन पाळण्याबाबत साशंकता आहे.
वसतिगृह दृष्टिक्षेपातक्षमता : मुलींच्या वसतिगृहाची इमारत पाच मजली असून, प्रत्येक मजल्यावर १६ अशा एकूण ८० खोल्या आहेत. येथे १५० मुलींच्या निवासाची सोय होणार असून, प्रत्येकी दोन मुलींना एक खोली अशा ७५ खोल्या मुलींसाठी आहेत. उर्वरित खोल्या रेक्टरसाठी आहेत. या वसतिगृहात कॅन्टीनसह सर्व सुविधांचा समावेश आहे.
कामच पूर्ण नाही, तर लोकार्पण कसे करणार?शेंडा पार्कात उभारण्यात येणाऱ्या ११०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचे भूमिपूजन व मुलींच्या वसतिगृहाचे लाेकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र, वसतिगृहाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने लोकार्पणाला विलंब होणार आहे.
वसतिगृहाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत पूर्ण होईल. - एस.आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर