कोल्हापूर : ‘केएमटी’मध्ये परिवाहन व्यवस्थापक म्हणून सुभाष देसाई यांनी कसेबसे सहा महिनेच काम केले; परंतु त्यातही त्यांनी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली, संस्थेला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यावर हीच संस्थेबद्दलची बांधीलकी त्यांच्या कुटुंबीयांनी जपली. त्यांच्या स्मरणार्थ देसाई परिवाराच्या वतीने मंगळवारी कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळेमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि परिवहन समितीच्या सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते त्याचे वाटप झाले.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, सुभाष देसाई यांनी पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये केएमटीला दिशा देण्याचे काम केले. त्याच दिशेने कर्मचाऱ्यांनी काम करावे. फेस शिल्ड वाटपाच्या उपक्रमामागची देसाई परिवाराची भावना मोठी आहे. परिवहन समितीच्या सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी देसाई यांनी समाजासाठी व केएमटीसाठी तळमळीने काम केले, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींबरोबर हातात हात घालून काम केले, अशी भावना व्यक्त केली.
परिवहन समितीचे सदस्य अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद देसाई, रमेश सरनाईक, मंगेश गुरव, वैभव देसाई, आरिफ शेख, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, आदी उपस्थित होते.