लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ)च्या अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील (शिरोली दुमाला, ता. करवीर) यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. दूध संघाच्या गोकूळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर होते. ‘गोकूळ’चे तेरावे अध्यक्ष म्हणून पाटील विराजमान झाले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी डॉ. गजेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव सदाशिव पाटील उपस्थित होते.
‘गोकूळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालीली राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये निकराची झुंज झाली. गोकूळच्या इतिहासात प्रथमच मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी २१ पैकी १७ जागा जिंकत सत्तांतर घडविले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी शुक्रवारी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांचे नाव बाबासाहेब चौगले यांनी सूचविले, त्यास डॉ. सुजित मिणचेकर यांनी अनुमोदन दिले. विरोधी चार संचालकांनी अर्ज दाखल न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. नूतन अध्यक्ष पाटील यांचा सत्कार नावडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतशबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
बंद पाकिटाची परंपरा कायम
अध्यक्षपदासाठी विश्वास पाटील व अरुण डोंगळे दोघेही इच्छुक होते. गुरुवारी नेत्यांनी संचालकांची मते अजमावून घेतल्यानंतर एकमत करण्याची जबाबदारी दोघांवर सोपवली. तरीही एकमत न झाल्याने मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सकाळी बंद पाकिटातून पाटील यांचे नाव पाठवून दिले. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज पाटील व शशिकांत खोत हे बंद पाकीट घेऊन आले, त्यांनी बाबासाहेब चौगले यांच्याकडे सुपुर्द केले, त्यांनी पत्रातील मजकूर संचालकांसमोर वाचून दाखवला. मागील संचालक मंडळातही नेते पाकिटातूनच अध्यक्षपदाचे नाव देत होते.
पाटील यांना दोन वर्षे संधी
विश्वास पाटील हे दोन वर्षेच अध्यक्षपदी राहतील, असे नेत्यांनी ठरवले आहे. मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वाक्षरीचे पत्रात १० मे २०२३ पर्यंत मुदत घालून दिली आहे.
तिसऱ्यांदा अध्यक्ष होणारे पाटील पहिलेच
‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या वाटचालीत सर्वाधिक काळ अध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील-चुयेकर यांनी २० वर्षे ५ महिने, त्यानंतर अरुण नरके यांनी दहा वर्षे काम केले. चुयेकर हे कारकिर्दीत दोन वेळा तर नरके यांना एकदाच अध्यक्ष झाले. विश्वास पाटील यांना तिसऱ्यांदा संधी मिळालीच मात्र चुयेकर, नरके यांच्यानंतर सर्वाधिक काळ ते अध्यक्ष म्हणून राहणार आहेत.