समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वयाची नव्वदी पार केलेल्या २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवले असून, हीच सकारात्मकता इतर रुग्णांनी ठेवण्याची गरज आहे. मूळची प्रकृती खणखणीत, कष्टदायी शरीरयष्टी व आजाराला पळवून लावण्याची हिंमत बाळगल्यानेच ते कोरोनाला हरवू शकले आहेत.गेल्यावर्षी मार्चपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाला प्रारंभ झाला. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा कहर झाला. विशेषत ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागले आणि मृतांमध्येही ज्येष्ठ नागरिकांनाच धक्का बसला. त्या तुलनेत यावर्षी मात्र तीव्र स्वरूपाच्या या विषाणूमुळे कमी वयाच्या युवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते.असे असले तरी वय जास्त असलेल्या नागरिकांनीही कोरोनावर मात केली आहे. पहिल्या लाटेत ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर, त्यापैकी १९८ जणांचा मृत्यू झाला. तर ९६ जणांनी कोरोनावर मात केली. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या दहा महिन्यांतील आहे. तर यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत १७० नव्वदीच्यावरील नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
- ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह २८४
- बरे झाले २३९
- पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह ११४
- दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह १७०
- पहिल्या लाटेतील मृत्यू १८
- दुसऱ्या लाटेतील मृत्यू २७
- २ ५० ते ६० वयोगटातील सर्वाधिक मृत्यूपहिल्या लाटेवेळी ज्येष्ठ नागरिकांचाच जास्त मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, दुसऱ्या लाटेवेळी तरुणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत ६० ते ७५ वयोगटातील ९६१ तर दुसऱ्या लाटेत गेल्या पाच महिन्यांत ६३२ अशा एकूण १५९३ जणांचा मृत्यू झाला आहे.माझी नोकरी मी सायकलवरूनच ये-जा करून पूर्ण केली आहे. मी पॉझिटिव्ह आलो तरी माझे जेवण व्यवस्थित घेत होतो. नोकरीतून निवृत्त झाल्यानंरही मी कधी व्यायाम चुकवला नाही. याचा मला फायदा झाला.- दादासोा यशवंत पाटील,वय ९७ रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर
- कोरोना झाला तरी त्यातून बरे होणार असा मला आत्मविश्वास होता. इचलकरंजीच्या सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन मी बरी झाले. मात्र वयोमानानुसार होणार त्रास सुरू आहे.-हिराबाई गणपती नाईक,वय ९६ रा. रुकडी, ता. हातकणंगले