कोल्हापूर : रंकाळा डी मार्टसमोरील पदपथावर गेल्या चार वर्षांपासून पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे एकाच जागी लॉकडाऊन अवस्थेत असलेल्या बाळासाहेब किसन सरनाईक (वय ६०) या निराधार वृद्धाला माऊली केअर सेंटरने मायेची ऊब देत आसरा दिला.बाळासाहेब मूळचे किणी (ता. हातकणंगले) गावचे रहिवासी. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यानंतर गाव सोडून त्यांनी कोल्हापुरात मांडव घालण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर वॉचमन म्हणूनही काम केले.
या दरम्यान गावकडची शेती लिलावात निघाली. मागे कोणीच नसल्याने ते कोल्हापूरला आले. चार वर्षांपूर्वी त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्यांनी रंकाळा डी मार्टसमोरील पदपथावर आसरा घेतला. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा तिन्ही ऋतूंत ते त्या ठिकाणीच चालता येत नसल्याने पडून येत होते.
जाता-येता हजारो माणसे त्यांना पाहत होती. मात्र, कोणाला मायेचा पाझर फुटला नाही. कोणाला दया आली तर ते त्यांना अन्न देत होते. त्यावर त्यांनी उदरनिर्वाह केला. शनिवारीही स्थानिक व काही राजकीय लोकांनी त्यांची स्थिती बघितल्यानंतर माऊली केअरशी संपर्क साधला.
माऊलीचे केअर टेकर दीपक व राहुल कदम बंधू तेथे रुग्णवाहिका घेऊन आले आणि त्यांनी बाळासाहेबांना तेथून आपल्या केअर सेंटरमध्ये नेले. त्यांचे केस कापले व स्वच्छ अंघोळ घातली. तेथे ते आता व्यवस्थित आहेत.
कोरोनाच्या काळातही माऊलीने अनेकांना मायेचा आधार नव्हे तर ऊब दिली आहे. संस्थेत आजमितीला ४८ जण आधार घेऊन आहेत. त्यांपैकी २८ जण निराधार आहेत. त्यांचा सर्व खर्च संस्था बघते. मात्र, सध्या कोरोनामुळे दात्यांनीही हात आखडता घेतला आहे. हा दातृत्वाचा झरा पुन्हा पाझरता राहिला तर अशा अनेक बाळासाहेबांना माऊलीकडून मायेची ऊब मिळू शकते.
कोरोनामुळे संस्थेकडे दात्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दात्यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात द्यावा.-दीपक कदम, माऊली केअर , कोल्हापूर.