लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोरोना काळात बाजारपेठेचा अंदाज घेत वाकरे (ता. करवीर) येथील शेतकरी कृष्णात पाटील या शेतकऱ्याने कारली या फळभाजीची लागवड केली. अवघ्या दीड महिन्यात १० टन कारली उत्पादन व तीन लाख रुपये विक्रीतून मिळवले असल्याने शेतकऱ्यांसमोर एक आदर्श शेतीचे उदाहरण ठेवले आहे.
कृष्णात पाटील यांची स्वतःची १० एकर बागायत जमीन आहे. पारंपरिक ऊस शेती करण्यावर पाटील यांचा भर असायचा पण गेल्या तीन वर्षापासून याला फाटा देत कृष्णात पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत फळभाजी लागवडीचा निर्णय घेतला. कारली लागवड फायद्याची व घरगुती भाजीची मागणी असल्याचा अंदाज घेऊन कृष्णात यांनी कारले लागवडीचा निर्णय झाला.
यावर्षी ७ एप्रिलला व्ही.एन.आर. या जातीच्या कारली बियाण्याची लागवड केली. ४५ गुंठे क्षेत्रात साडेचार फूट सरी सोडून बेडवर ठिबक व पॉलिथीन पेपर टाकून लागवड करण्यात आली. अवघ्या दीड महिन्यात पहिला तोडा केला. आतापर्यंत १० ते १२ टन कारली उत्पादन मिळाले आहे. दरही ३० ते ३५ रुपये मिळाला आहे. यातून तीन साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. यापुढे आणखी महिनाभर कारले उत्पादन होणार असून आणखी १० टन कारले उत्पादन होणार आहे. यातून आणखी तीन लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता किमान पाच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे
चौकट
कोरोना काळातही चांगला उठाव
कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही घरगुती भाजीसाठी कारल्याला मोठी मागणी आहे. त्यातच कारल्याला औषधी गुणधर्म असल्याने इतर फळभाज्यांच्या तुलनेत मोठी मागणी आहे.
प्रतिक्रिया
उसाच्या शेतीत किमान दीड वर्षे जमिनीचे क्षेत्र गुंतून राहते. ऊस तुटल्यानंतरही कारखान्याकडून वेळेत ऊस बिल मिळत नाही. यामुळे कमी कालावधीत व रोख पैसे देणारी कारले उत्पादन गेली ३ वर्षे लागवड करत आहे.
कृष्णात पाटील शेतकरी
फोटो
वाकरे ता. करवीर येथील प्रगतिशील शेतकरी कृष्णात पाटील यांची कारल्याची शेती. कारली तोडा झाल्यानंतर पँकिंग करताना.