मोहन सातपुते
उचगाव : गत वर्षापासून कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातल्याने उद्योग, व्यापारासह सर्वच आस्थापने आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडली आहेत. वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे; मात्र अशा काळातही कोल्हापूर विमानतळावरून २५ मे २०२० पासून आजपर्यंत तब्बल ७५ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातही कोल्हापूर विमानतळ भारी ठरले असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरमध्ये अलायन्स एअर लाईन्सच्या माध्यमातून ९ डिसेंबर २०१८ पासून विमानसेवा सुरू झाली. या विमानतळावरून ९ डिसेंबर २०१८ पासून ६ एप्रिल २०२१ पर्यंत ५८०० फ्लाईटमधून सुमारे २ लाख २५ हजार ७०० प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे मार्च २०२० ला लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांचा ओघ कमी झाला नाही. २५ मे २०२० पासून आजअखेर २०१० फ्लाईटमधून ७५ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला आहे.
कोल्हापूर विमानतळावरून तिरुपती, बंगळुरु, हैदराबाद तसेच मुंबईनंतर अहमदाबादही हवाई मार्गाने कोल्हापूरशी जोडले गेले आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी प्रवासासाठी कोल्हापूर विमानतळाला पसंती देत आहेत. कोल्हापूर विमानतळावर सध्या अलायन्स,टू -जेट, इंडिगो या त्रिमूर्ती विमान सेवा कंपन्यांच्या भागीदारीने विमान सेवा सुरू आहे. फेब्रुवारी २० पासून कोल्हापूर ते अहमदाबाद नव्या विमान सेवेची सुरुवात झाली. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस सकाळच्या सत्रात ही विमानसेवा सुरू आहे. अलायन्स एअर लाईनची कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळुरु अशी सेवा सुरू आहे.इंडिगो एअर लाईनची हैदराबाद-कोल्हापूर, तिरुपती-कोल्हापूर,अहमदाबाद-कोल्हापूर अशी विमान सेवा आहे. टू-जेट एअर लाईनकडून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू आहे. यामुळे दिवसभरात १०-१२ फ्लाईट्स कोल्हापूरसाठी सुरू आहेत.
कोट : कोल्हापूर विमानतळावर अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अलायन्स एअर लाईन ,टू-जेट,इंडिगो एअर लाईन्स कंपनीच्या पुढाकाराने उड्डाणे सुरू आहेत.
कमलकुमार कटारिया,
प्रकल्प संचालक
कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण.
चौकट : धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षक भिंत, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा आदी कामे प्रगतिपथावर आहेत. विमानतळ विस्तार व त्रिमूर्ती एअर लाईन्स कंपन्यांच्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या विकासात्मक पर्यटन, व्यापार-उद्योग वाढीला चालना मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकासकामे होत राहिल्याने विमान प्रवाशांचा चढता आलेख वाढत राहिला आहे.
फोटो : १४ विमानतळ
विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची ये-जा सुरू झाली.