कोल्हापूर : कोरोनाकाळात एकीकडे नोकऱ्या, रोजगारावर गदा आली असताना, छोटे, मोठे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असताना दुसरीकडे एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराने आधाराचा हात दिला आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सुमारे ६२ कोटी रुपयांचा पंधरा हजार टन पोषण आहार पुरवण्यात आला.
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने चार प्रकारातील बालक आणि महिला, मातांना हा पोषण आहार पुरवण्यात येतो. एका वेळी एकदम दोन महिन्यांचा आहार देण्यात येतो. १५ एप्रिल २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार धान्य पुरवण्यात येते. गतवर्षी कोरोना सुरू झाल्यापासून शाळा, अंगणवाड्या बंद झाल्या. अनेकांना छोटे व्यवसायही शासकीय बंधनांमुळे करता आले नाहीत; परंतु या विभागाच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारामध्ये खंड पडलेला नाही. किंबहुना कोरोनाकाळात हा आहार कुटुंबीयांना आधार देणारा ठरला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने १ एप्रिल २०२० पासून ३१ मे २०२१ या १४ महिन्यांमध्ये ६२ कोटी रुपयांचा १५ हजार ७५५ टन पोषण आहार घरोघरी पोहोच केला. अंगणवाड्या सुरू नसतानाही बालकांच्या मुखामध्ये हा आहार गेला.
चौकट
२९ हजार गरोदार, स्तनदा मातांना लाभ
गरोदर महिला आणि स्तनदा माता यांनाही चांगला आहार मिळावा या हेतून पौष्टिक धान्य पोहोच केले जाते. जिल्ह्यातील २८ हजार ८१८ गरोदर आणि स्तनदा मातांना याचा लाभ झाला. आठ कोटी रुपयांचा आहार त्यांना पोहोच करण्यात आला.
चौकट
धान्य असे...
चवळी/घना, मूग/मसूर डाळ, गहू, मिरची तिखट, हळद, मीठ, साखर, तांदूळ, चणा
चौकट
उष्मांक, प्रथिनांनुसार आहार
हा किराणा माल पुरवताना संबंधित घटकातील लाभार्थ्याला किती उष्मांक आणि किती प्रथिने मिळाली पाहिजेत, याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार रोज त्याला किती साहित्य लागणार, याचे मोजमाप ठरवण्यात आले आहे. ते रोज पोहोच करणे परवडणारे नसल्याने किंवा रोज वितरित करणे अशक्य असल्याने दोन महिन्यांचा आहार एकदम दिला जातो. हे कोरडे साहित्य असल्याने त्याचा गरजेनुसार वापर कुटुंबीय करू शकतात.
चौकट
अ. न. लाभार्थी गट लाभार्थी वार्षिक रक्कम
१ ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतचे लाभार्थी ८७५६७ २१,०१,६०८००
२ गरोदर व स्तनदा माता २८८१८ ६,९१,६३२००
३ कुपोषित लाभार्थी १०३२३४ १९,६५,६००
४ ३ ते ६ वर्षांपर्यंतचे लाभार्थी २,२०,४३८ २४,७७,६१,६००
एकूण वार्षिक रक्कम ५२,९०,५१,२००
कोट
या योजनेतून कोरोना काळातही चांगल्या पद्धतीने पूरक पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला. कोरोना काळात हा आहार साहाय्यभूत ठरला.
-सोमनाथ रसाळ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला आणि बालविकास विभाग, जि. प., कोल्हापूर