संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही नियोजन, पाठपुरावा आणि तांत्रिक अडचणी सोडवून शिवाजी विद्यापीठाच्यापरीक्षा मंडळाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विविध ७३९ परीक्षांचा निकाल तीस दिवसांत ऑनलाईन जाहीर केला. त्यामुळे वेळेत निकाल लावण्याची परंपरा विद्यापीठाने यावर्षीही जपली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठाने मार्च-एप्रिल या उन्हाळी सत्रातील परीक्षा दि. १५ ऑक्टोबर ते दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत ऑनलाईन स्वरूपात घेतल्या. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार, एखाद्या अभ्यासक्रमाची परीक्षा झाल्यानंतर तिचा निकाल ३० ते ४५ दिवसांमध्ये जाहीर करणे आवश्यक आहे. पण, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजनबद्ध काम करून ७३९ परीक्षांचे निकाल तीस दिवसांमध्ये जाहीर केले आहेत.
विद्यार्थ्यांना दिलासा
यावर्षी उन्हाळी सत्रात बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी, आदी विविध अभ्यासक्रमांच्या २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात सत्र दोन, चार, सहा, आठ आणि दहाचे अधिकतर विद्यार्थी होते. कोरोनामुळे त्यांची परीक्षा लांबणीवर पडली होती. त्यातील अधिकतर विद्यार्थी हे अंतिम वर्षातील होते. अंतिम वर्षाचा निकाल लागल्यानंतर पुढे नोकरी, रोजगार मिळविणे अथवा उच्चशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. याबाबत त्यांची अडचण होऊ नये, या उद्देशाने विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निर्णय, सूचनांनुसार कार्यवाही करत परीक्षा मंडळाने तीस दिवसांत निकाल जाहीर केले. परीक्षेचा वेळेत निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
हिवाळी सत्रात ऑफलाईन परीक्षा
ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील हिवाळी सत्रात विद्यापीठाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण ६६४ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा निर्णय अधिकार मंडळाकडून घेण्यात येईल. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, त्याची अंतिम मुदत दि. ७ डिसेंबरपर्यंत आहे. सलग दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचा विचार करून विद्यापीठाने यावर्षी विलंब, अतिविलंब शुल्क माफ केले आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
उन्हाळी सत्रात झालेल्या परीक्षा : ७३९
परीक्षार्थी : २ लाख २० हजार
हिवाळी सत्रात होणाऱ्या परीक्षा : ६६४
परीक्षार्थी : सुमारे दोन लाख
कोरोनाच्या स्थितीत परीक्षा घेण्याचे आव्हान होते. मात्र, अधिकार मंडळाच्या सूचनेनुसार ऑनलाईन पद्धतीने उन्हाळी सत्रातील परीक्षा घेण्यात आल्या. योग्य नियोजन आणि तांत्रिक अडचणी तत्काळ मार्गी लावून ७३९ परीक्षांचे निकाल वेळेत ३० दिवसांमध्ये जाहीर केले. - गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ