कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांना जर झोपेतही सरकार जाईल असे वाटत असेल तर मी काय करू, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता पाटील म्हणाले, काहीही घडले की भाजपवर टीका करायची असा एककलमी कार्यक्रम झाला आहे. ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे. त्यांचा संबंध आमच्याशी जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यांनी भाजपमधील १००च काय २४० जणांची यादी द्यावी आणि कारवाईसाठी पाठपुरावा करावा. ईडी अचानक कारवाई करत नाही. काहीतरी असेल म्हणूनच नोटीस पाठविली असेल ना, मग भाजपच्या नावाने शंख करायची गरज काय, असा सवालही पाटील यांनी केला. लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिला आहे; त्याचा दुरुपयोग सध्या सुरू असल्याचेही ते म्हणाले.
राऊतांच्या बोलण्यात तथ्य - जयंत पाटील
केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्यांना ईडीकडून नोटीस बजावून त्रास देण्याचे व त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणला जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही ते म्हणाले.