कोल्हापूर : या जन्मात तरी मी राजकारणात जाणं शक्य नाही अशा स्पष्ट शब्दात कणेरी येथील सिद्धगीर मठाचे स्वामी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी आपल्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.गेले वर्षभर काडसिद्धेश्वर स्वामी हे भाजपच्यावतीने लोकसभेचे उमेदवार असतील, ते राज्यसभेवर जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी भव्य असा ‘सुमंगल’ महोत्सव आयोजित केल्यानंतर तर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेला ऊत आला. त्यांची भाजपशी वाढती जवळीक आणि हे सगळे निवडणुकीसाठीच सुरू असल्याची चर्चा जनमाणसांत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांनीच आता आपण या जन्मी तरी राजकारणात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.याबाबतचा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, या महोत्सवाच्या पहिल्याच बैठकीत मी हे स्पष्ट केले की, महाराज हा महोत्सव घेत आहेत म्हणजे काही तरी आहे अशी चर्चा आता बाहेर सुरू होणार. परंतु तसे काहीही नाही असे मी त्याचवेळी स्पष्ट केले होते. मी संन्यासी आहे आणि संन्यासत्व हे जगात श्रेष्ठ मानतो. त्यामुळे आतापर्यंत मला अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊ केली, राज्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मी सर्वांना नम्रपणे नकार दिला. कारण मी एकीकडे सर्वसंगपरित्याग करून आलो असताना पुन्हा मी या सगळ्यामध्ये अडकणे योग्य नाही असे मी मानतो.
Kolhapur News: अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी भाजपात प्रवेश करणार? स्वामींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 1:58 PM