अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी शहर परिसरातील वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाने संघटित गुन्हेगारी कायद्या (मोक्का)चा आधार घेत तब्बल दहा टोळ्यांना मोक्का लावला आहे. यामध्ये ६४ गुन्हेगार गजाआड झाले असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील ९० टक्के गुन्हेगार हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. तसेच राज्यातील एका शहरात दहा टोळ्यांना मोक्का लागणारे हे पहिलेच शहर आहे.पोलिसांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही गुन्हेगारी कृत्ये व अवैध व्यवसाय मात्र सुरूच आहेत. हा वाढलेला गुन्हेगारीचा आलेख पाहून नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मोक्का कायद्याचा आधार घेत धडक मोहीम सुरू केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना मोक्का लागला आहे. त्यातील इचलकरंजीच्या दहा टोळ्या आहेत.या कारवाईचा धसका मोठे गुन्हेगार व टोळी कार्यरत असलेले गुन्हेगार घेत आहेत. मात्र, अन्य व्यक्तिगत गुन्हेगार व फाळकूटदादा हे मात्र मोकाटच आहेत. ते या संघटित गुन्हेगारी कायद्यात बसत नाहीत. याचाच गैरफायदा घेत त्यांच्याकडून गुन्हेगारी कारनामे सुरूच आहेत. त्यामुळे सन २०१८ सालच्या गुन्हेगारीचा आलेखही कायम राहिल्याचे दिसत आहे. तसेच शहर परिसरातील अवैध व्यवसायही चांगलाच फोफावला आहे. पैशाची चटक लागल्याने कारवाईची तमा न बाळगता काही गुन्हेगारांनी आपले कारनामे सुरूच ठेवले आहेत. मटका, गुटखा, लॉटरी सेंटर, आॅनलाईन कॅसिनो, जुगार, सट्टा यासह कारखानदारांना धमकावून त्यांच्या कारखान्यांतील विविध कामांत आपला हिस्सा ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. मेंडिंग, नॉटिंग, वहिफणी अशी कामे आपल्यालाच मिळावीत, म्हणून धमकावले जाते. अशा सर्व प्रकारच्या अवैध व्यावसायिकांची साखळी व संबंध मोडीत काढणे म्हणावे तेवढे सोपे नाही. याचा गांभीर्याने विचार करून कडक कायद्याचा आधार घेत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनाही मोडीत काढणे गरजेचे बनले आहे.तब्बल ६४ जण गजाआडमोक्का लागलेल्या इचलकरंजीतील टोळ्यामध्ये अमोल माळी, गुंड्या ऊर्फ मुसा जमादार, विठ्ठल शिंदे, प्रवीण रावळ, सनी बगाडे, सुदर्शन बाबर, अविनाश जर्मनी, शाम लाखे, चंदू लोहार व नवीन जर्मनी यांचा समावेश आहे. या टोळ्यांतील तब्बल ६४ जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.एस. चैतन्य व खोचे यांनीही केली कारवाईचार वर्षांपूर्वी इचलकरंजी शहरातील गुन्हेगारी जगत मोडून काढण्यासाठी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक एस. चैतन्य या आयपीएस अधिकाºयांनीही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख मानसिंग खोचे यांना सोबत घेऊन धडाकेबाज कारवाई केली होती. त्यावेळीही मोठमोठे गुन्हेगार हबकले होते. त्यांच्याकडून झालेल्या कारवाईचे इचलकरंजीतील शहरवासीयांनी स्वागत केले होते. त्यांच्यानंतर पुन्हा पोलीस दलात मरगळ निर्माण झाली आणि गुन्हेगारीने नव्या जोमाने डोके वर काढले.
‘मोक्का’चे हत्यार तरीही गुन्हेगारी कारवाया सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:43 AM