लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खास महिलांसाठी चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचा सामना कसा करावा, मुली व महिलांवरील हल्ले कसे परतावून लावायचे, अशा एक ना अनेक हल्ल्यांना दमदारपणे परतावण्यासाठी ‘लोकमत सखी मंच व कुडो असोसिएशन, कोल्हापूर’तर्फे १६ ते २० जानेवारीपासून कसबा बावड्यातील गंगा भाग्योदय हाॅलमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान खास ‘टशन से’ हे विशेष स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात चेन स्नॅचरकडून मंगळसूत्र खेचल्यानंतर कसे व कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर करायचे, याबद्दल महिलांना सहजरीत्या अवगत होणारे तंत्र शिकविले जाणार आहे. यासह अनेक वेळा चोरी, अत्याचार करण्याच्या उद्देशाने होणारे हल्लेही कसे परतावून लावायचे, याबद्दल ४० तंत्रे कुडोच्या रूपाने शिकवली जाणार आहेत. कुडो हे जापनीज तंत्र असून हा मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. हे तंत्र सोप्या व महिलांना सहजरीत्या आत्मसात करता यावे. याकरिता खास प्रशिक्षित तीन दान ब्लॅकबेल्ट अमेझिंग मास्टर प्रशिक्षक अर्चना बराले व त्यांची कन्या ब्लॅकबेल्ट श्रुती बराले यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय ध्यानधारणा योगा प्रशिक्षक गीतांजली ठोमके, आहार कसा घ्यावा, याकरिता डाॅ. शर्मिला देशमाने आणि फिजोओथेरपिस्ट डाॅ. प्रांजली धामणे, झुम्बा एक्सपर्ट शेफाली मेहता आणि मेडिटेशनसाठी डॉ. सरोजिनी नेजदार याही मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांकडे वैयक्तिक लक्ष व कुडो असोसिएशनतर्फे त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कुडो असोसिएशन, कोल्हापूरचे अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, उपाध्यक्ष शिवाजी घोलप, सचिव विश्वास बराले यांच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिराचे आयोजन प्रिया बासराणी, अलिशा भानुशाली, वारणा वडगावकर यांनी केले आहे. नोंदणीसाठी ८४८५८९०८६६, ९८२२१२१७७०, ९०४९६३४६३० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
(कुडो संग्रहित छायाचित्र वापरणे.)