कोल्हापूर : जिल्ह्यात येणारा महापूर व इतर आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी जिल्हा आपत्कालीन पथकाने ९० तरुणींची ‘आपदा सखी’ टीम तयार केली आहे. या तरुणींना महापुरात बोट, तराफा चालविणे, उपलब्ध साधनसामग्रीमध्ये इतरांचे व स्वत:चे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कसबा बावडा मार्गावरील होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर थरारक कसरतींचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.आपत्कालीन परिस्थितीत महिला व तरुणींचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे; त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या आपदा मित्र संकल्पनेतून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महिलांची ‘आपदा सखी टीम’ तयार करण्याचे नियोजन केले आहे. होमगार्ड विभागातील तरुणी व इतर धाडसी तरुणांचा या पथकात समावेश केला आहे.
९० तरुणींना जिल्हा आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. अपघात, महापूर यांत अडकलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे, प्राथमिक उपचार कोणते द्यायचे, याची तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून माहिती दिली जात आहे.
या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात गुरुवारी सकाळी होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात सुरू झाली. यावेळी सुवर्णा कांबळे, शीतल काळे या तरुणींनी या शिबिरातून आम्हाला धाडसी बनविले जात आहे. हे प्रशिक्षण घेऊन आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चा व इतरांचा जीव कसा वाचवायचा, मदत कशी करायची, याची माहिती मिळते, असे सांगितले.