कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन अखेर स्थगित करण्यात आले.यासंदर्भातील माहिती शिवमहोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी लोकमतला दिली.आजी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत शिवमहोत्सवात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे आज सायंकाळी ५ वाजता मराठी राजभाषा या विषयावर कीर्तन होणार होते. मात्र, विद्यापीठाच्या आवारात हा कार्यक्रम होउ देणार नाही, असा इशारा अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी दिल्यानंतर कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देउ असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यानंतर वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात नको, खासगी ठिकाणी कार्यक्रम घ्या, पण विद्यापीठाच्या आवारात कार्यक्रम नको, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोण जबाबदार असा सवालही पुरोगमाी संघटनांनी केला तर हिंदुत्ववादी संघटनांनी कायदा आणि सुव्यवस्थो सांभाळण्यास पोलिस सक्षम आहेत, कार्यक्रम पूर्वनियोजित आहे, तो घ्यावा, प्रसिध्दीसाठी पुरोगामी संघटना स्टंट करत आहेत, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे.
इंदोरीकर महाराजांचे कीर्तन मराठी राजभाषा दिनासंदर्भात आहे. युवकांचे मार्गदर्शन करण्याच्या कार्यक्रमात कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार असताना हा विरोध कशासाठी असे मत हिंदुत्ववादी संघटनांनी मांडले. केवळ विद्यापीठात हा कार्यक्रम होतो आहे, म्हणून या कार्यक्रमाला विरोध करणे हा स्टंट आहे, अशी टीकाही त्यांनी केली.दरम्यान, कुलगुरुंच्या दालनात या दोन्ही संघटनांशी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी चर्चा करुन दोन्ही बाजू समजून घेतल्या. त्यानंतर संयोजकांशी चर्चा केल्यानंतर हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय कुलगुरुंनी जाहीर केला.
दरम्यान, इंदोरीकर महाराज अजून नगरमध्ये आहेत. त्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी उशिर होणार असल्यामुळे तांत्रिक कारणांमुळे कोल्हापूरातील कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती या महोत्सवाचे संयोजक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी दिली. हा कार्यक्रम पुन्हा तीन महिन्यांनी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, शिव महोत्सवातील इतर सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.