अविनाश कोळी - सांगली रसिकप्रेक्षकांची सुरक्षा, त्यांच्यासाठीच्या सेवा-सुविधा, नियमांचे पालन याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी आज (गुरुवारी) सकारात्मक प्रतिसाद दिला. मायबाप रसिकांसाठी सर्व काही करण्याची तयारी असल्याचे मत महापालिका प्रशासन तसेच सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह व्यवस्थापनाने व्यक्त केले. भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू झाले असून, लवकरच नाट्यगृहाचा कायापालट होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून ‘लोकमत’ने सांगली, मिरजेतील नाट्यगृहांच्या प्रश्नांवर मालिका सुरू केली आहे. या वृत्तमालिकेस नाट्यगृह व्यवस्थापनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘लोकमत’ने योग्य गोष्टी मांडल्या असून, रसिकप्रेक्षकांच्या समाधानासाठी नाट्यगृह व्यवस्थापन बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच सांगली, मिरजेतील नाट्यगृहे नाट्यपंढरीला साजेशी होतील, असेही त्यांनी सांगितले. (समाप्त)‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या मालिकेची दखल आम्ही घेतलेली आहे. मालमत्ता व्यवस्थापकांना सांगली, मिरजेतील दोन्ही नाट्यगृहांची वस्तुस्थिती आणि उपाययोजनांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच नाट्यगृहांमधील उणिवा दूर करून ती सुसज्ज करण्यात येतील. - अजिज कारचे, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकारसिकप्रेक्षकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यावरच नाट्यगृहांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक हाच केंद्रबिंदू मानून नाट्यगृह व्यवस्थापनांनी सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. असे झाले तरच नाट्यगृहांकडील रसिकप्रेक्षकांचा ओढा वाढेल. - शफी नायकवडी, रंगकर्मी, सांगलीनाट्यगृहांनी प्रिमायसेस परवान्यासाठी अर्जच दाखल केलेले नाहीत. विनापरवाना नाट्यगृहे सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. अजून एकाही नाट्यगृहाकडून आमच्याकडे परवान्यासाठी अर्ज आलेला नाही. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. - संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगलीदिशाभूल नको...नाट्य संमेलनात विषय नियामक मंडळासमोर प्रिमायसेस किंवा अन्य परवान्यांचा विषयच चर्चेला आला नाही. विषय नियामक मंडळासमोर जे ठराव मांडले जातात तेच ठराव संमेलनाच्या समारोपावेळी मांडले जातात. यापूर्वी ९४ संमेलनात जे ठराव पारीत झालेत व या संमेलनात मांडले गेलेले ठराव याचा पाठपुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. परवान्यांचा आणि पूर्तता समितीशी संबंध लावून दिशाभूल केली जाऊ नये, असे मत मंडळाचे सदस्य शफी नायकवडी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रेक्षकांसाठी अखेर जोहार मायबाप जोहार...
By admin | Published: February 13, 2015 12:30 AM