कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी, परिवहन तसेच महिला व बालकल्याण समितीच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या सभापती निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. कॉँग्रेस नगरसेवकांची नाराजी, शिवसेनेने निर्णय घेण्यास लावलेला विलंब आणि ताराराणी-भाजपच्या नगरसेवकांनी केलेली मोर्चेबांधणी यामुळे कोण सभापती होणार याबाबत कमालीची उत्कंठा लागून राहिली आहे. दरम्यान, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्या नगरसेवकांना पक्षादेश (व्हिप) लागू केला आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी मुरलीधर जाधव (राष्ट्रवादी) व सत्यजित कदम (ताराराणी आघाडी) यांच्यात, तर परिवहन समिती सभापतिपदासाठी लाला भोसले (कॉँग्रेस) व विजयसिंह खाडे-पाटील (भाजप) यांच्यात लढत होणार आहे. सभापती होण्यासाठीचे संख्याबळ अतिशय काठावरच आहे. त्यामुळेच चुरस निर्माण झाली आहे. स्थायी व परिवहन समितीवर शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. त्यांनी सत्ताधारी कॉँग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा दिला किंवा निवडीवर बहिष्कार टाकला तर राष्ट्रवादीचे उमेदवार मुरलीधर जाधव हे स्थायी सभापती, तर लाला भोसले हे परिवहन सभापती होऊ शकतात. त्यामुळे कॉँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत; परंतु त्यातून त्यांच्या हाती काही फारसे लागले नव्हते. शिवसेनेने या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची हे अद्याप ठरविले नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले व नियाज खान यांना बुधवारी (दि. ३) मुंबईत ‘मातोश्री’वर बोलावून घेण्यात आले होते. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी त्यांची चर्चा झाली. आज, शुक्रवारी सकाळीच ते मुंबईहून कोल्हापूरला येणार आहेत. त्यांनी निर्णय लांबविला असल्याने उत्कंठा वाढली आहे. जर शिवसेनेने भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा दिला, तर ‘स्थायी’वर ८-८, तर परिवहन समितीवर ६-६ असे संख्याबळ होणार आहे. जर तसे घडले तर मात्र पीठासन अधिकारी अविनाश सुभेदार यांना चिठ्ठ्या टाकून सभापतींची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर होत असलेल्या या निवडणुकीबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. (प्रतिनिधी)
संपेल कधी हा ‘प्रवास’ मो-बाईकर्सचा?
By admin | Published: February 05, 2016 12:47 AM