संतोष मिठारी -- कोल्हापूर --उत्पादन प्रक्रियेत कापड धुणे, रंगविणे आणि छपाई करणे, यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. अधिकतर कंपन्या हे पाणी सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे पाठवितात; पण याला अपवाद ठरत ‘इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड’ने या पाण्याचा पुनर्वापर केला आहे. त्यातून महिन्याकाठी साडेसात कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे.कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सन २००६ मध्ये इंडोकाउंट इंडस्ट्रीजच्या होम टेक्स्टाईल डिव्हिजनमधून उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतील पाणी सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे पाठविले जात होते. मात्र, पाण्याच्या बचतीच्या उद्देशाने कंपनीने उत्पादन प्रक्रियेतील या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी कंपनीने ६० कोटी रुपये खर्च करून इटलीतील तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारले. दिवसाकाठी दोन लाख मीटर कपड्याच्या उत्पादनासाठी सध्या साडेतीन लाख दशलक्ष घनफूट (एमएलडी) पाणी लागते. यातील अडीच लाख एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरले जाते. उर्वरित एक एमएलडीपैकी सहाशे किलोलिटर पाण्याचे कपडा सुकविण्याच्या प्रक्रियेत बाष्पीभवन होते, तर उर्वरित पाणी कंपनीच्या ५० एकर परिसरातील दोन हजार झाडांना दिले जाते. त्यामुळे ही बाग चांगलीच बहरली आहे.पुनर्वापरापूर्वी इंडोकाउंट इंडस्ट्रीजला दिवसाला ५० लाख लिटर पाणी राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून घ्यावे लागत होते. आता अवघे दहा लाख लिटर पाणी घेतले जाते. त्यामुळे इंडोकाउंट इंडस्ट्रीजमध्ये दररोज तब्बल ४० लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारे २५ लाख लिटर पाणी हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून उपलब्ध होते. अशा पद्धतीने महिन्याकाठी साडेसात कोटी लिटर पाण्याची बचत करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुनर्वापराचा इंडोकाउंट कंपनीचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम अन्य उद्योगांना निश्चितपणे दिशादर्शक ठरणारा आहे.पाणी पिण्यायोग्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची सूचना आणि भविष्यातील पाण्याची होणारी उपलब्धता यांचा विचार करून पाणीबचत, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कंपनीने पाच एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारले असल्याचे कंपनीचे मुख्य अभियंता बी. डी. मुतगेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, पूर्णत: सेंद्रीय पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अगदी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासह महिन्याला साडेसात कोटी लिटर पाण्याची बचत झाली. शिवाय पाण्यावरील खर्चही कमी झाला आहे.कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाउंट इंडस्ट्रीजच्या होम टेक्स्टाईल्स डिव्हिजनने सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर करून पाणीबचत साधली आहे.
दरमहा साडेसात कोटी लिटर पाण्याची बचत
By admin | Published: June 01, 2016 1:23 AM