आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : बेघरांना आसरा, अंध-पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशू-पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी व निराशांना हिंमत. 'हाच आमचा रोकडा धर्म, हीच खरी भक्ती व देवपूजा आहे.' हा संत गाडगेबाबांचा संदेश शिरोधार्य मानत प्राचार्य दिवंगत रा. तु. भगत आयुष्यभर राबले. गाडगेबाबांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच त्यांनी १९९६ साली 'संत गाडगे महाराज अध्यासन केंद्राची' सुरुवात केली. तीस वर्षांपूर्वी जोतिबा रोडवरील गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोर गरिबांना अन्नदान करण्याची सेवा सुरू केली. झुणका-चपाती व केळी दर रविवारी दुपारी १२ वाजता १०० गरिबांना वाटप केली जाते.कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती या अन्नदानासाठी स्वत:हून प्राचार्य भगत यांच्याकडे निधी देत असत. एखाद्याने जास्त निधी दिला तर त्या रविवारी लागणाऱ्या साहित्यापुरता निधी ते घ्यायचे व राहिलेला परत देत असत. त्यांच्या निधनानंतर ही अन्नदानाची जबाबदारी अध्यासनाचे अध्यक्ष एस. एन. पाटील, मुरलीधर देसाई, डॉ. सरोज बीडकर, डॉ चांगदेव बंडगर, एम. बी. शेख, जॉर्ज क्रूज व सिद्धेश भगत पाहत आहेत.प्रत्येक रविवारी दुपारी बारा वाजता हे अन्नदान सुरू होते. त्यात कधीच खंड पडत नाही. गोरगरीब गरजू, अंबाबाईला येणारे भाविकही प्रसाद म्हणून याचा लाभ घेतात. उत्तम प्रतीचा झुणका, गरमागरम चपाती आणि केळी दिल्या जातात. एका व्यक्तीला झुणका-चपाती खाताना विचारले, "मामा कशी आहे झुणका-चपाती? त्याने सात्त्विक भावनेने सांगितले, पोरा आमच्यासारख्या गरिबांना कोल्हापुरात भरपूर ठिकाणी भरपेट थाळी मिळते; पण गाडगेबाबांच्या छायेत मिळणाऱ्या झुणका-चपातीने पोट भरते.
देसाई दाम्पत्याची सेवा..मारुती व सुशीला देसाई हे वृद्ध दाम्पत्य चपाती व झुणका करून आणते. आम्ही करतो ते अन्न गोरगरिबांच्या पोटात जाते, याचा आनंद फार वेगळा आहे, असे ते आवर्जून सांगतात. रविवारी प्रामाणिकपणे २५० चपात्या, त्याला पुरेल इतका झुणका व केळी घेऊन ते हजर असतात.