कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये सोमवारी आयोजित विवेकानंद कॉलेज (स्वायत)च्या गुणी विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.डॉ. कलशेट्टी म्हणाले, पर्यावरण संवर्धनाकरिता सर्वोच्च क्षमतेने योगदान देत विवेकानंद कॉलेजने शहरात पर्यावरण चळवळ उभी केली आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहिले पाहिजे.अध्यक्षीय संबोधनात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. बापूजींनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. स्वराज्य मिळाल्यानंतर स्वराज्यचे सुराज्य व्हावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली.
या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी ज्ञानी, विज्ञानी आणि सुसंस्कारी बनविण्यासाठी बापूजींचे तत्त्वज्ञान अंमलात आणावे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्याचा मंत्र आपल्या संस्था प्रार्थनेतून व बोध वाक्यातून बापूजींनी दिला आहे.प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. डी. बी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. प्रभावती पाटील व प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, प्रा. सहिदा कच्छी, प्रा. एस. एस. कुंडले, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात यावेळी डॉ. शरद साळुंखे, महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.गुणवंतांचा सत्कारशैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांतील नैपुण्य मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळविल्याबद्दल सम्मेद शेटे, कला शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देवयानी जोशी, कॉमर्स शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार रोहित पाटील, विज्ञान शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार ऐश्वर्या मोरे यांना प्रदान करण्यात आला.