कळंबा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन यांसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले खरे, मात्र याच नियमांना आता नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. कळंबा परिसरात अनेकजण विनामास्क संचार करत असल्याने कोराेनाचा संसर्ग कसा थांबवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, आजही बहुतांश नागरिक घराबाहेर कारण नसताना फिरत असून विनामास्क वावरणाऱ्यांची संख्या कळंबा व लगतच्या उपनगरांत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सुरुवातीला दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करणारे संबंधित प्रशासनाचेसुद्धा आता याकडे दुर्लक्ष होत असल्याने विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्याची संख्या वाढत आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर संबंधित पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आर्थिक दंडाची कारवाई सुरू केली होती. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव कळंबा व लगतच्या उपनगरांत वाढत असून, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तरीही नागरिकांत जागरुकता नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना संबंधित प्रशासनामार्फत राबविण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोना रोखण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आणि जरुरीचे असून देखील सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.