समीर देशपांडे --कोल्हापूर --मराठा आरक्षणाबाबत पुरावे सादर करताना राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराजांनी सन १९०२ मध्ये दिलेला आरक्षणाचा आदेशाचाही आधार घेतला आहे. कोल्हापूरच्या पुराभिलेख विभागातूनच साडेतीन वर्षांपूर्वी हा आदेश अधिकृतपणे शासनाच्या अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांमध्ये समाविष्ट केला आहे. मराठा समाज आरक्षण समितीची बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. यावेळी या समितीचे अध्यक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी न्यायालयात आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोसपणे बाजू मांडण्यासाठी कोल्हापूरच्या पुराभिलेख कार्यालयातूनही कागदपत्रे आणल्याचा उल्लेख केला होता. त्याला अनुसरून माहिती घेतल्यानंतर या सर्व कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने शाहू महाराजांचा आरक्षणाचा आदेशाचा समावेश असल्याची माहिती मिळाली. साडेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्री आणि मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या आदेशानुसार आरक्षणासाठी पावले टाकली गेली व शैक्षणिक आरक्षण जाहीरही करण्यात आले. हा निर्णय घेण्याआधी राणे यांनी अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. त्यांच्यावर राज्यभरातून जुनी, नवी कागदपत्रे संकलित करण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे साडेतीन वर्षांपूर्वीच हे अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी कोल्हापूरच्या पुराभिलेख कार्यालयातील शाहू महाराजांचा मराठा व अन्य मागास जातींविषयीचा नोकरीतील ५० टक्के आरक्षणाचा आदेश सही-शिक्क्कांसह अधिकृतपणे साक्षांकित प्रतीसह घेतला. डॉ. जयसिंगराव पवार यांचीही या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या आदेशाचे महत्त्व विशद करणारी एक टिप्पणीही यावेळी डॉ. पवार यांनी त्यांना दिली. हाच शाहूंचा आदेश आता या प्रक्रियेत पुरावा म्हणून समाविष्ठ झाला आहे. मराठा आरक्षणाची प्रक्रिया जेव्हा चार वर्षांपूर्वी राज्यात सुरू झाली तेव्हा राणे समितीने सुचविल्याप्रमाणे अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी माझी भेट घेतली आणि शाहू महाराजांच्या सन १९०२ च्या आरक्षण आदेशाबाबत चर्चा केली. पुराभिलेख कार्यालयातून त्यांनी अधिकृत सही-शिक्क्यानिशी छायांकित प्रतीही घेतल्या तसेच याबाबत एक स्वतंत्र टिप्पण देण्याची त्यांनी मला विनंती केली. त्यावेळी तत्कालीन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व परिस्थितीचे आकलन करून मी सविस्तर टिप्पणीही दिली. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देणारा हा क्रांतिकारी आदेश मराठा आरक्षण चळवळीचा पायाच आहे, असे म्हटल्यास अतिशोयोेक्ती ठरणार नाही. - डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक
पुराव्यांमध्ये राजर्षी शाहूंचा आदेश
By admin | Published: October 07, 2016 1:06 AM