लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. याचे ठोस पुरावे तेथील सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले असल्याची माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी दिली.
ही तलवार परत आणण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मेल आणि पत्रे पाठवली आहेत, असेही ते म्हणाले. आडसुळे म्हणाले, कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी सन १८७५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या तत्कालीन ग्रेट ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ती शिवरायांच्या वापरातील जगदंबा तलवार होती, हे संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सिद्ध केले आहे. तर, इंग्लंडमधील साडून केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स ॲण्ड ऑबजेक्ट्स ऑफ आर्ट या कॅटलॉगमध्ये तलवारीचे छायाचित्र आणि माहिती देण्यात आली आहे.
सोन्याने कोरलेली नक्षी...nजुनी युरोपियन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. nतलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज आहे. शेवटचे टोक अणकुचीदार आहे. त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत. nही तलवार कोल्हापूरच्या छत्रपतींकडून दिली गेली असून, ती मराठ्यांचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे. सदर तलवार ही त्यांच्या वापरातील होती.