लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऑक्सिजन अभावी कोल्हापूरात एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त एका माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.
करवीर तालुक्यातील गिरगाव येथील माजी सैनिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सकाळी त्यांंना जोडलेला ऑक्सिजन संपला, त्यामुळे त्यांनी दम लागत असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काहीवेळाने रुग्णाची तडफड सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ऑक्सिजन आणण्यासाठी धावाधाव झाली. पण यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकांसमोर केला. महापालिकेचे उपायुक्त निखील मोरे व त्यांच्या पथकांनी तसेच पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांनीही घटनेची तपासणी केली.
याबाबत उपायुक्त निखील मोरे म्हणाले, काल (शुक्रवारी) सायंकाळीच संबधीत हॉस्पिटलने एजन्सीकडून ऑक्सिजनचा पुरेसा साठा घेतला होता, तो शनिवारी दुपारपर्यत पुरेल इतका शिल्लक होता. हॉस्पिटल प्रशासनाचा ऑक्सिजन जोडणीतील हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सृकतदर्शनी दिसून येते. तरीही आम्ही डॉक्टर रिपोर्ट, पंचनामा यांची कार्यवाही सुरु केली.
पोलीस बंदोबस्त...माजी सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून गोंधळ केला जाऊ नये यासाठी हॉस्पिटल आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे रंकाळा टॉवर परिसरात पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.