कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या विविध ११८ पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अखेरच्या सत्रातील परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्या. या परीक्षांना काही कारणांमुळे गैरहजर राहिलेल्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.
ऑनलाईन स्वरूपात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा यावेळेत विविध चार सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. त्याचे वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी जाहीर केले आहे.कोरोना पॉझिटिव्ह अथवा क्वॉरंटाईन व्हावे लागल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि तांत्रिक अडचणींमुळे सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा देता आली नाही. त्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थींची (रीपिटर) उन्हाळी सत्रातील परीक्षा (विधी (लॉ), औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळता) दि. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. महाविद्यालय पातळीवर ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने ५० गुणांच्या या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी एक तासाचा वेळ असून बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नपत्रिका असणार आहे.विद्यार्थ्यांनी नोंदणी करावीया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, ई मेल, परीक्षेचा विषय, आदी माहिती त्यांनी नोंदणीवेळी द्यावी. अधिक माहितीसाठी महाविद्यालय अथवा विद्यापीठातील परीक्षा मंडळ येथे संपर्क साधवा.